राजू काळे
भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेला केंद्राच्या पीएम ई सेवा योजनेंतर्गत एकूण १०५ ई-बस मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी ४२ बस प्राप्त झाल्या आहेत. यामुळे अस्तित्वातील बस मार्गांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासह नवीन बस मार्ग सुरू करण्याच्या मागण्यांना सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.
पालिका क्षेत्रातील भाईंदर पूर्व व पश्चिम परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली असून, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती विकसित झाल्या आहेत.
या परिसरातून दररोज हजारो नागरिक, नोकरदार वर्ग, चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी हे नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने भाईंदर रेल्वे स्थानकातून मुंबई, ठाणे व इतर ठिकाणी प्रवास करीत असतात.
या प्रवाशांना भाईंदर पूर्व व पश्चिम परिसरातील अंतर्गत भागांना जोडणारी पुरेशी व नियमित सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो.
अनेक अंतर्गत मार्गावर थेट बससेवा नसल्याने नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी अथवा स्थानकाहून आपल्या निवासस्थानी परतण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, प्रवाशांना जास्त पैसे मोजून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, अनेकांना नाईलाजाने पायपीट करावी लागते.
विशेषतः नवघर रोड, नवघर नाका, शिर्डी नगर, गोडदेव, बंदरवाडी तसेच भाईंदर पश्चिमेकडील ६०, ९० व १५० फूट रोड परिसरात सार्वजनिक परिवहन सेवेची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना परवडणाऱ्या दरात, सुरक्षित व नियमित सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने भाईंदर पूर्व ते नवघर नाका वर्तुळाकार बस मार्ग, नवघर नाका ते गोडदेव नाका मार्गे भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक ते बंदरवाडी नाका असा वर्तुळाकार मार्ग सुरू करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.
या वर्तुळाकार मार्गावर बस सेवा सुरू झाल्यास नवघर, गोडदेव, बंदरवाडी व इतर परिसरातील प्रवाशांना भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणे सोईस्कर ठरेल. तसेच नवघर नाका व नवघर रोडवरून बाळाराम पाटील मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.
याचप्रमाणे भाईंदर पश्चिमेकडील ६० व ९० फूट मार्गावरील बालाजी कॉम्प्लेक्स ते माहेश्वरी भवन मार्ग मार्गे संत सेवालाल महाराज चौक, पालिका प्रभाग समिती क्रमांक १ कार्यालय ते डी-मार्ट, ९० फूट मार्ग ते ६० फूट मार्गे भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान नवीन वर्तुळाकार बस मार्ग, तसेच भाईंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते १५० फूट मार्ग दरम्यान वर्तुळाकार बस मार्ग, भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक ते भाईंदर पोलीस ठाणे मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, १५० फूट मार्ग ते मॅक्सस मॉल चौक असा वर्तुळाकार बस मार्ग सुरू करण्याची मागणी देखील सरनाईक यांनी केली आहे.
हे मार्ग सुरू केल्यास भाईंदर पश्चिम परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अंतर्गत भागांमध्ये प्रवास करण्यासाठी परवडणारी, सुरक्षित व नियमित बससेवा उपलब्ध होऊन या सेवेमुळे नागरिकांचा प्रवास खर्च कमी होण्यासोबतच रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
या मार्गांवर मिनीबस सेवा सुरू करण्याबाबत संबंधित परिवहन व वाहतूक विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली आहे.
भाईंदर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक-२४ अंतर्गत येणाऱ्या उत्तन, पाली व चौक या गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत ती ३५ हजारांवर गेली आहे. या परिसरातील बहुतांशी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात दररोज सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करतात.
समस्येवर तोडगा निघेल...
या परिसरात उत्तन, गोराई व मनोरी बीच, एस्सेल वर्ल्ड, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, उत्तन वेलंकनी चर्च, धारावी देवी मंदिर यांसारखी पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळे असल्यामुळे विविध जिल्ह्यांतून पर्यटक, भाविक तसेच मासळी व्यवसायाच्या निमित्ताने व्यापारी व इतर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.
मात्र, भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाहून उत्तन, पाली व चौककडे सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या ठरत असल्याने प्रवाशांना तासन्तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने त्यांना व त्यांच्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
याबाबत पालिकेला अनेकदा पत्रव्यवहार व निवेदने देण्यात आली असतानाही नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे उत्तन येथील मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
बसेसचे योग्य नियोजन करावे...
उत्तन ते भाटे बंदर वेलंकनी या मार्गावरही गर्दीच्या वेळेत मिनी बसेसच्या नवीन फेऱ्या सुरू कराव्यात, उत्तन बस स्थानक परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्या जातात. परिणामी परिवहन बसेसना वळण घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे उत्तन नाक्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन बसेसच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. परिवहन विभाग, प्रभाग अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे या संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे व उपलब्ध पर्यायी उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करून उत्तन, पाली, चौक व परिसरातील नागरिकांच्या गरजेनुसार बसेसचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.