भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मौजे नवघर मधील कनाकिया परिसरात पालिकेने रुग्णालयाचे आरक्षण क्रमांक 302 वरील एकूण 13 हजार चौरस मीटर जागेत अतुल शहा नामक विकासकाच्या सनटेक या गृहप्रकल्पाला बांधकाम परवानगी दिली आहे. त्यातील 40 टक्के जागेत म्हणजेच सुमारे 5 हजार 500 चौरस मीटर जागेत पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाच्या अनुषंगाने जमिनीच्या सॉईल टेस्टिंगच्या कामाला सुरुवात झाली असून हे रुग्णालय येत्या 3 वर्षांत साकारणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
उर्वरीत 60 टक्के जागेत विकासकाकडून गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यात येणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम, बांधकाम टिडीआरच्या माध्यमातून केले जाणार असून त्यासाठी पालिकेचा एकही पैसा खर्च होणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. हे रुग्णालय बांधण्याच्या अनुषंगाने पालिकेने विकासकाला 7 ऑक्टोबर 2022 रोजी बांधकामाची परवानगी देत बांधकाम नकाशाला मंजुरी दिली.
यावेळी बिल्डरने रुग्णालयाची इमारत अगोदर बांधून तीचे हस्तांतरण पालिकेकडे केल्यानंतर स्वतःच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्याचे ठरविण्यात आले होते. यानुसार रुग्णालयाचे भुमीपूजन 11 ऑक्टोबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र बिल्डरने रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने रुग्णालयाच्या बांधकाम परवानगीची मुदत संपुष्टात आली. त्यावर पालिकेने 14 एप्रिल 2023 रोजी विकासकाला सुधारीत बांधकाम परवानगी दिली. तरीही बिल्डरने दिड वर्षे होऊन देखील रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु न करता स्वतःच्या गृहप्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग परस्पर सुरु केली.
हि इमारत बांधण्यासाठी शहा नामक विकासकाने मेसर्स सनटेक या बांधकाम कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करीत स्वतःच्या स्काय पार्क गृह प्रकल्पाची जाहिरात करून ग्राहकाकडून फ्लॅट बुकिंगपोटी सुमारे 300 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप त्यावेळी सरनाईक यांनी केला. तसेच बिल्डरने पालिकेसह ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या इमारतीच्या बांधकाम परवानगीला स्थगिती देण्याची मागणी तत्कालीन आयुक्तांकडे केली. त्याची दखल घेत तत्कालीन आयुक्तांनी विकासकाच्या बांधकाम परवानगीला 21 जून 2023 रोजी स्थगिती दिली. सरनाईक यांच्या मागणीनुसार मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्याची चौकशी सुरु असली तरी ती लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचे तूर्तास दिसून येत आहे.
पालिकेने 8 जानेवारी 2025 रोजीच्या प्रशासकीय बैठकीत विकासकाच्या गृहप्रकल्पाला दिलेला स्थगिती आदेश रद्द केल्याची माहिती सभागृहाला दिली. यानंतर विकासकाने पालिकेशी तडजोड करीत रुग्णालयासह गृहप्रकल्पाचे बांधकाम समांतर करण्याबाबत पालिकेचा होकार मिळविला. तर पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी देखील मागचे विसरून आता काय होणार आहे, त्यावर चर्चा करून विकासकाने रुग्णालय बांधकामाच्या अनुषंगाने सॉईल टेस्टिंगच्या कामाला सुरुवात झाल्याचे सांगितले.
असे असेल रुग्णालय
हे रुग्णालय एकूण 377 बेडचे असून त्यात 300 जनरल बेड, 50 आयसीयू बेड व 22 इमर्जन्सी बेडचा समावेश आहे. तसेच या रुग्णालयात डॉक्टर्स व नर्सेसच्या निवास व्यवस्थेसह पॅरामेडिकल कॉलेजची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे 14 मजली रुग्णालय एकूण 3 लाख 50 हजार चौरस फूट क्षेत्रात साकारले जाणार असून त्याचे बांधकाम येत्या 3 वर्षांत पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.