Thane Crime pudhari photo
ठाणे

Thane Crime : मिरा-भाईंदरमध्ये तीन दिवसात तीन विवाहितांसह एका अल्पवयीन मुलीने जीवन संपवले

चारही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात गेल्या तीन दिवसांत आत्महत्येचे धक्कादायक सत्र पाहायला मिळाले असून, तीन विवाहित महिला आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. या घटना अनुक्रमे भाईंदर, काशिमीरा, नवघर आणि उत्तन सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या असून, चारही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

भाईंदर पश्चिम येथील उत्तन रोडवरील राई गावातील न्यू सालासर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता सुदामा लाहा (वय २७) यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांचे पती सुदाम लाहा यांनी त्यांना तातडीने टेंभा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी सायंकाळी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. भाईंदर पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत मिरा रोड येथील काशिमीरा, सृष्टी सेक्टर-०५ मधील अनुराधा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सुप्रिया मोरे (वय २७ ) यांनी शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बेडरूममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतला. पोलिसांनी त्यांना तात्काळ भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात दाखल केले, परंतु रात्री १० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पती राजेश मोरे यांच्या खबरीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

भाईंदर पूर्व येथील पूजा नगरमधील भैरव दर्शन इमारतीत राहणाऱ्या गंगा ललितकुमार अदलाखा (वय ५३) यांनी शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसताना हॉलमधील छताच्या लोखंडी कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. पती ललितकुमार अदलाखा यांनी त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता रात्री डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नवघर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तनच्या धावगी डोंगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून छताच्या लाकडी बांबूला ओढणीने गळफास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ती सर्दी आणि खोकल्याच्या आजाराने त्रस्त होती, त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तिला पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असता रात्री ९.५० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आई सबिया शेख यांच्या खबरीवरून उत्तन सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. आत्महत्याचे सत्र सुरूच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT