भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच युती, महायुती व आघाडीसाठी राजकीय घोडदौड सुरु झाली. शिंदे सेनेला भाजपसोबत युती करायची इच्छा असताना भाजपच्या स्थानिक स्तरावरून त्याला विरोध केला जात आहे. यामुळे सेनेने भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत युतीसाठी चर्चा सुरु केली आहे. मात्र भाजपचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी यंदाची निवडणूक स्वबळावरच लढण्याचे संकेत आयोजित पत्रकार परिषदेत देत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे दोन्ही पक्षांच्या उभयतांमध्ये युतीबाबत कोणता निर्णय होईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र युतीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावरून भाजपचे स्थानिक नेतृत्व आ. मेहता यांना वरीष्ठांनी सेनेसोबत युती करण्याचे आदेश दिल्यास त्यावर मेहता यांची भूमिका काय असेल, यावर मात्र मेहता यांनी सावध भूमिका घेत वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी तूर्तास मेहता यांनी सेनेसोबत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. येत्या 21 डिसेंबर रोजी भाजपच्या संकल्प सभेचे आयोजन मीरा रोड येथील एस. के. स्टोन येथे करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. भाजपला पाठिंबा देण्यासाठी या सभेत हजारो लोकं सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच सभेतून भाजप आपल्या प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भाजपमधून लढण्यासाठी 390 इच्छुकांनी अर्ज भरले असून त्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया देखील पार पडल्याचे त्यांनी सांगितले. यावरून भाजपने एकूण 24 प्रभागातील 95 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या इच्छुकांपैकी ज्यांना पक्ष नेतृत्वाकडून उमेदवारी देण्यास अंतिम मान्यता मिळेल तेच निवडणूक लढवू शकणार असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडल्याने सेना-भाजपमधील युतीवर संभ्रमाचे ढग आणखी गडद झाल्याचे दिसून आले आहे. तर भाजपच्या स्वबळाबाबत बोलताना मेहता यांनी पक्षाचे 1 लाख 70 हजार प्राथमिक सदस्य असून 15 हजाराहून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत.
शहरातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपला दिवसेंदिवस लोकांचा पाठिंबा वाढत असून भाजप पूर्ण ताकदीने यंदाची निवडणुक लढवून महापालिकेत पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल आणि शहराचा महापौर भाजपचाच असेल, असा दावा करून त्यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत.
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक शिवसेना व भाजपने एकत्र लढावी, यासाठी दोन्ही पक्षांची युती करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्य्क्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. यापैकी चव्हाण यांच्यासोबत तर युतीबाबत अंतिम चर्चा झाल्याने त्यावर पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलणार आहेत. येत्या शनिवारी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे येणार आहेत. त्याचवेळी ते युतीबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.प्रताप सरनाईक, प्रताप सरनाईक