कल्याण, भिवंडी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के File Photo
ठाणे

Mild Earthquake | कल्याण, भिवंडी परिसरात भूकंपाचे सौम्य हादरे

अहवाल तपासणीसाठी हैदराबाद प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी/डोंबिवली : भिवंडी शहर व परिसरातील ग्रामीण भागात मंगळवारी रात्री साडेआठ पावणे नऊ वाजताच्या सुमारास दोन ते तीन सेकंदाचे भूकंपाचे सौम्य हादरे बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर कल्याणमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

भिवंडी शहरातील भादवड, टेमघर पाडा, शांतीनगर तर ग्रामीण भागातील सरवली, राजनोली, सोनाळे या गावात हे हादरे जाणवले आहेत. हादरे जाणवल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घराबाहेर पळ काढला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरणसुद्धा पसरले होते. या घटने बाबत भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हादरे बसल्याची नोंद रिश्टर स्केलमध्ये आलेली नसून याबाबतचा अहवाल तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवला असून तेथून माहिती आल्यानंतरच नक्की हे हादरे कशामुळे बसले, हे स्पष्ट होईल, अशी माहिती दिली आहे. दरम्यान कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात व्हर्टेक्स इमारतीतील भीषण आगीमुळे एकीकडे शहरात खळबळ उडाली असतानाच कल्याणच्या सापर्डे गावाचा परिसर धक्क्यांनी हादरल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशी यांनी दिली. तर दुसरीकडे कोनगाव तसेच भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये धक्के जाणवले विशेष म्हणजे दोन दिवांपूर्वीच मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्येही धक्के जाणवले.

रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक काही सेकंद किंवा मिलीसेकंदासाठी अचानक जमीन हादरल्याची माहिती हादरे जाणवलेल्या गावातील स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र काही कळायच्या आत हे हादरे जसे जाणवले तसेच थांबले, अशी माहिती या स्थानिक रहिवाशांनी दिली.

रहिवाशांमध्ये गोंधळ

अचानक जाणवलेले हे हादरे नेमके कशामुळे जाणवले, याचे गूढ वाढले असून गावातील रहिवाशांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याबाबत आसपासच्या परिसरामध्ये चौकशी केली असता त्याठिकाणी मात्र काही हादरे जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कल्याणमध्ये जाणवलेल्या या हादऱ्यांबाबत शासकीय स्तरावरून अद्याप कोणतीहीन अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT