सापाड (ठाणे) : कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. या वादामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून म्हाडा पुनर्विकास प्रकल्प आता केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय मुद्दा राहिला नसून, तो राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत असताना, सर्वसामान्य नागरिक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हाडाच्या प्रकल्पावरून कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली आहे. शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. म्हाडाच्या एका रखडलेल्या प्रकल्पाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांच्यावर प्रकरण चिघळवण्याचा आरोप केला. तर दुसरीकडे नरेंद्र पवार यांनी आ. भोईर यांच्यावर बिल्डरची वकिली करत असल्याचा गंभीर आरोप करत परखड शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. कल्याण येथील शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाने एका खासगी बिल्डरकडे दिला आहे. मात्र हा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे.
शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या विषयाची दखल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. म्हाडाकडून अहवाल मागविला असून लवकरच अधिकृत बैठक होणार आहे. सरकार सकारात्मक भूमिकेत असताना, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपोषणाचा इशारा देत प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी उपोषण करू नये.विश्वनाथ भोईर, आमदार.
रहिवाशी न्यायासाठी विविध ठिकाणी खेटे मारूनही तो मिळत नसल्याने संतप्त झालेले नागरिक आता आंदोलकाच्या भूमिकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला, या पार्श्वभूमीवर शनिवारी सोसायटीतील नागरिकांनी बैठक घेतली.
दरम्यान या राजकीय संघर्षामुळे सोसायटीचे रहिवासी गोंधळले आहेत. न्यायासाठी सुरू असलेली धडपड राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या भोवर्यात अडकत आहे.
हे प्रकरण केवळ वाद आणि आरोपांपुरते मर्यादित न राहता पुनर्विकासाच्या दिशेने मार्गस्थ होईल का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या बैठकीला आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील आणि संजय पाटील हे देखील उपस्थित होते.