ठाणे : 'वडाळा - घाटकोपर - कासारवडवली' या मेट्रो चार प्रकल्पाचे काम ठाण्यात प्रगतीपथावर असून माजिवडा येथील मेट्रो स्थानकाच्या छताचे काम हाती घेण्यात येणार आहे.
माजिवडा उड्डाणपुलावरुन नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक २८ ते ३१ मे या कालावधीत रात्रौ दहा ते पहाटे पाच या वेळेत पुलाखालील मार्गावरुन वळवण्यात येणार आहे. या वाहतूक बदलांमुळे रात्री उशिरा या भागात अवजड वाहनांची मोठी कोंडी होऊन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गाशेजारील ज्युपिटर रुग्णालयाजवळ माजिवडा मेट्रो स्थानकाचे काम सुरु असून त्यावर छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. या कामादरम्यान जॅक बीम टाकून त्यावर राफ़्टर उभारले जाईल. हे काम एक ६० टन मोबाईल क्रेनच्या साहाय्याने होणार आहे. रात्रौ दहा वाजता ही क्रेन ज्युपिटर रुग्णालयासमोरील माजिवडा उड्डाणपुलाच्या चढणीवर उभी करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत हे काम सुरु राहणार असल्याने या पुलावरून घोडबंदर रोड व नाशिककडे जाणारी सर्वच प्रकारची वाहने पुलाखालील मार्गिकेवरुन पुढे जातील, असे ठाणे वाहतूक शाखेच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मुंबईकडून नाशिक व घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने रात्री दहानंतर माजिवडा उड्डाणपुलावर न जाता पुलाखालून कापूरबावडी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील. त्यामुळे या सर्कलवर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच या कोंडीचे टोक कॅडबरी जंक्शनपर्यंत आल्यास याठिकाणीही कोंडी होण्याची शक्यता आहे.
या मार्गावर रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांचा प्रवास मोठ्या प्रमाणात होतो. त्यांच्या कोंडीत हलकी वाहने खोळंबण्याची शक्यता असून या वाहनांना घोडबंदर रोड, भिवंडी तसेच नाशिककडे जाण्यासाठी रात्री उशिरा मनस्ताप सहन करावा लागण्याची भीती या वाहतूक बदलांमुळे व्यक्त केली जात आहे.