ठाणे : वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या मेट्रो-4 या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून याच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचा आमचा मानस असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे याच महिन्यात मेट्रो -4 ही ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे घोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या सेवा रस्त्यांची कामे 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश एमएमआरडीएला देण्यात आले असून 15 जानेवारीपर्यंत घोडबंदर महामार्गही वाहतूक कोंडीमुक्त होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी एमएमआरडीएड, महापालिका आणि इतर अधिकाऱ्यांची ओवळा माजिवडा मतदार संघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. वडाळा-घाटकोपर ते गायमुख असा मेट्रो -4 प्रकल्प कधी सुरू होणार याची सर्वानाच प्रतीक्षा आहे. मेट्रो-4 हा मार्ग मुंबईहून तीनहात नाका मार्गे घोडबंदरला जोडण्यात आला आहे.
पूर्वी कासारवडवलीपर्यंत हा मार्ग होता. मात्र त्यांनतर त्याचा विस्तार करून पुढे गायमुखपर्यंत या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला. मेट्रोच्या कामामुळे दररोज घोडबंदर महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आले होते. आता डिसेंबरमध्येच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण होणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असल्याने याच महिन्यात सर्वसामान्य ठाणेकरांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
दुसरीकडे घोडबंदर मार्गावर सुरू असलेल्या सेवा रस्त्यांच्या कामांमुळे देखील ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र ही सर्व कामे येत्या 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा सूचना आपण एमएमआरडीएला दिल्या असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करत आहोत, वाहतूक कोंडीचे मी खापर कोणावरही फोडणार नाही, सर्वच अधिकारी चांगले काम करत आहेत. परिवहन मंत्री आणि आमदार म्हणून वाहतूक कोंडीची मी जबाबदारी घेत असल्याचे सांगत 15 जानेवारीपर्यंत घोडबंदर वाहतूक कोंडीमुक्त होईल, असे आश्वासन यावेळी सरनाईक यांनी दिले.
मेट्रो स्टेशनवरून उतरताच मिळणार एसटी, बस आणि रिक्षा...
ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर आले आहेत त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या वतीने नवीन डिजाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी मेट्रो स्टेशनवरून जेव्हा खाली उतरतील तेव्हा त्यांना प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा देखील मिळणार आहे. या ठिकाणी रिक्षा, एसटी आणि परिवहन बसेसला उभे राहण्याची परवानगी देण्यात आली असून खासगी वाहनांना मेट्रोच्या ठिकाणी थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
वाहतूक विभागाला आरटीओची साथ...
घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांना आरटीओची देखील मदत मिळणार आहे. आरटीओचे पाच पथक वाहतूक पोलिसांना देण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. कापूरबावडी ते गायमुख या मार्गावर वाहतूक पोलिसांचे केवळ 45 वाहतूक पोलीस असून त्यांच्या मदतीला आता आरटीओची मदत मिळणार आहे.
घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता जोडणी प्रकल्पात समन्वयाचा अभाव...
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या सेवा रस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम सध्या अडथळ्यात आले आहे. महापालिकेची खोदकामे आणि मेट्रो मार्गिकेच्या प्रलंबित कामांमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकत नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.
या बैठकीत विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव असल्याचे या निमित्ताने समोर आले. परंतु समन्वयाचा अभाव हा कंत्राटदारांत असून दोन यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.