MBBS Doctor : राज्यात दरवर्षी 12 हजार 824 एमबीबीएस डॉक्टर होणार File Photo
ठाणे

MBBS Doctor : राज्यात दरवर्षी 12 हजार 824 एमबीबीएस डॉक्टर होणार

यावर्षी वाढल्या ९८० नवीन वैद्यकीय जागा; देशात वैद्यकीय शिक्षणाला मोठी चालना

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : दिलीप शिंदे

देशातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरू आहे. त्याअनुषंगाने ठोस पाऊले टाकत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सन २०२५-२६ या वर्षांत देशभरात एमबीबीएस पदवीच्या ११ हजार ५०० नवीन जागा वाढवून ४४ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५ नवीन महाविद्यालये आणि ९८० अतिरिक्त वैद्यकीय जागांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊन दरवर्षी १२ हजार ८२४ नवीन एबीबीएस डॉक्टर रुग्णसेवा बजावण्यास सज्ज होतील.

देशभरातील ग्रामीण आणि शहरातील आरोग्य सेवा अधिक सदृढ बनविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय शिक्षण सक्षम करण्यावर भर दिली आहे. देशभरात ४४ नवीन महाविद्यालये आणि अन्य महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ११ हजार ५०० अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात आल्याने सन २०२५-२०२६ या वर्षामध्ये ८१९ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १ लाख २९ हजार २५० जागा झाल्या आहेत. तर नूतनीकरणाच्यावेळी काही गंभीर कारणास्तव काही महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या ४५६ जागा कमी करण्यात आलेल्या आहेत. सन २०२४-२५ या वर्षात देशभरात एमबीबीएसच्या १ लाख १७ हजार ७५० जागा होत्या.

देशातील निवडक राज्याची आकडेवारी अशी

एमबीबीएसच्या वाढलेल्या जागांमध्ये सर्वाधिक १५०० जागा ह्या कर्नाटकमध्ये वाढल्या असून दुसऱ्या क्रमांकांच्या ९८० अतिरिक्त जागा ह्या महाराष्ट्रातील आहेत. उत्तर प्रदेशामध्ये ९००, तामिळनाडू ८५० आणि पश्चिम बंगाल राज्यात ८०० जागा वाढलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मेडीकल कॉलेज

दुसरीकडे नव्याने मंजुरी मिळालेल्या ४४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक ६ महाविद्यालये ही राजस्थान आणि महाराष्ट्रात ५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज, पनवेल, ईएसआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंधेरी मुंबई, श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज, कोपरगाव, नगर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिन, नवी मुंबई आणि मालती मल्टिस्पेशालिटी अँड मेडिकल कॉलेज, तुरखेड, अकोला या नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच राज्यभरातील आठ महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या ५८० वाढीव जागांना मंजुरी देण्यात आल्याने राज्यात १२ हजार ८२४ एमबीबीएस डॉक्टर तयार होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT