Women talk Pudhari
ठाणे

वळणावरची चाहुल

सासूबाईआल्या असतील इथपासून मेनापॉज सुरू नाही ना झालाय तुझा, इथपर्यंत प्रश्न विचारून सगळ्यांनी भंडावून सोडलं तिला

पुढारी वृत्तसेवा

ज्योती मुळ्ये

कोणत्याही प्रहरी बाहेर जायचं म्हटलं की, उत्साहाने फसफसणारी मैत्रीण म्हणाली आणि आम्ही आश्चर्यचकित झालो. काय गं, घरातून तरी पडलीय का?... दाराबाहेर पडलं की, पहिला सेल्फी काढणारी तू... सासूबाईआल्या असतील इथपासून मेनापॉज सुरू नाही ना झालाय तुझा, इथपर्यंत प्रश्न विचारून सगळ्यांनी भंडावून सोडलं तिला. नाही गं, तसं काहीच नाही झालंय. मलाच हे सगळं आता थांबवायला हवं, सिलेक्टिव्ह व्हावं असं वाटतंय. तिच्या म्हणण्यात थोडंफार तथ्य जाणवलं प्रत्येकीला.

झालंय काय की, आम्ही मैत्रिणींनी आजवर मजामस्ती धम्माल करण्याची एकही संधी दवडलेली नाही. लग्न, मुंजी, बारसे, केळवणं, डोहाळजेवणं, मोठ्या ट्रिप्स, वन डे पिकनिक्स, बर्थ डे पार्टीज, कॉफी मीट्स, पावसाळी सहल, गरबा, श्रावणभोजन, भिशी पार्ट्या, शहरातले पिकनिक स्पॉट्स अशी धम्माल करण्याचं प्रत्येक कारण आम्ही हसतहसत आपलंस केलेलं आहे. साहजिकच, प्रत्येकाचे आठवड्यातले तीन दिवस सहज बाहेर निघत असतात. बरं सर्वांचंच मित्रमंडळ मोठं असल्याने प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणं मस्ट होतंय गेल्या काही दिवसांत! गेलं नाही तर मग, ॲटिट्यूड आहे हं... माणूसघाणे आहेत... सोशल व्हायला नको... स्वतःला हाय प्रोफाईल समजतात. तुम्ही काय बा, मोठे! आम्हां गरिबांकडे कशाला याल, यासारखे टिपिकल टोमणे तुमची वाट पाहात असतातच.

कधी स्वखुशीने, कधी नातं म्हणून, कधी हितसंबंध राखण्यासाठी आणि कधी टोमणे टाळण्यासाठी का होईना, आपण सगळेजण या चक्रात ओढले जातो. पण, कधीतरी अशी वेळ येतेच की, हे सगळं नकोसं वाटू लागतं. आपण सिलेक्टिव्ह व्हायला लागतो. पूर्वी ज्या गोष्टी हिरिरीने आणि मनःपूत आनंदाने करायचो त्यातून मन उडतं. त्या नकोशा वाटू लागतात. काही नाही, वय झालंय तुझं! असं म्हणून वरवर या नॉशियाची बोळवण केली जात असली तरी खरं कारण तेच आहे.

जसजसं वय वाढतं तसतसा हा कलकलाट नको वाटतो. पूर्वी ज्या गोष्टींसाठी झुरायचो त्यातला चार्मच निघून जातो. हे असं का होतं, आपलं आपल्यालाही समजत नाही. पण, याला कारणीभूत ठरतात, काही प्रमाणात आलेले अनुभव, मनाची बदलती अवस्था, शारीरिक मर्यादा आणि परिस्थिती! यामुळे आपल्याही नकळत आपण बदलत जातो. हौसेच्या भरात आलेला एक्सटेंडेड फॅमिलीजचा झटका विरत येतो. नवी माणसं जमवण्याचा, त्यांचं सायासांनी करत राहायचा उत्साह ओसरून जातो.

पूर्वी भुरळ घालणारा शिमर गाऊन हळूहळू सॉफ्ट, कम्फर्टेबल अशा लिननच्या सलवार कमीझवर शिफ्ट होतो. आवडीने खाल्लं जाणारं मल्टीक्युझिन मागं पडून त्याची जागा पचायला हलकी आलेली दाल खिचडी किंवा घरचं सात्विक जेवण घेतं. एवढंच कशाला, एरवी घरीदारी इतक्या-तितक्यावरून भडकणारे गृहकलहसुद्धा खुमखुमी जिरल्यामुळे पेटण्यापूर्वीच शमतात.

कुठे रिॲक्ट व्हायचं आणि कुणाला इग्नोअर करायचं याचे आडाखे वय वाढत जातं, तसे बदलत जातात. हे सगळं इतकं नकळत होत जातं की, एखादी वेळ तर मी खरंच बदललोय की काय असा विचार करायला प्रवृत्त करते. या बदलांबद्दल आपणही अनभिज्ञच असतो. इथं आपल्याला दणकून शॉक बसतो आणि लोक तर काय, क्रिटीसाईझ करायला टपलेलेच असतात. लोकांना तुमच्यासाठी, तुम्ही बदललात, मोठे झालात (संपत्तीने), वांझोटं वैराग्य आलंय यातलं कुठलंही लेबल संयुक्तिक वाटलं नाही तर हमखास तुम्हाला नवी माणसं मिळाली हे लेबल चिकटवतातच!

खरं तर हे सगळं प्रत्येकाच्या बाबतीत घडणार असतं. काही दिवसांच्या फरकाने सगळेच असं वागणार असतात. पुंकेसर, कळी, फुल, फळ या अवस्थांमधून परिपक्व होत जाणं हाच निसर्ग आहे. आपण फक्त हा कौल मान्य करून त्यानुसार वागायचं असतं. बदलाशी जुळवून घ्यायचं असतं.

माणसांची गजबज नको असेल तर छंद आहेत. शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देता येईल. समाजोपयोगी काम करता येईल. नवं काही शिकता येईल. मनःशांतीकडे वळता येईल. एक ना अनेक... लक्षात इतकंच ठेवायचंय, फांद्या छाटल्या की झाडाला नवे धुमारे फुटतात. अधिक जोमाने पालवी बहरू लागते. झाड नव्या साजशृंगारासह एकाच जन्मात नवं आयुष्य जगू लागतं. आयुष्य नव्याने जगू लागतं असंही म्हणता येईल. एका बाजूने आवरलेला बहर दुसऱ्या अंगाने फुलणारच! गरज असते, हा नवा टप्पा आणि नवं वळण स्वीकारण्याची !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT