ठाणे

जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वी नवा अध्यादेश? कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या हालचाली

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत आरक्षणासाठी 20 जानेवारीपर्यंत दाखल होण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा आंदोलक मुंबईत येण्यापूर्वी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली आहे.

मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन आरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने कुणबी नोंदी तपासणार्‍या शिंदे समितीला राज्यात फेरदौरे करून संपूर्ण नोंदी तपासण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिंदे समितीने राज्यात फेरआढावा सुरू केला आहे. यानुसार सापडलेल्या नोंदी लक्षात घेऊन नवा अध्यादेश काढण्याची तयारी सरकारने केली आहे. यामध्ये सगेसोयरे असा असलेला उल्लेख काढून रक्ताची नाती असलेल्या तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रत्येकाचे शपथपत्र या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यासंबंधी सरकारने सकारात्मक पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. यासाठीचा अध्यादेश काढण्याची तयारी मंत्रालय पातळीवर सुरू झाली आहे. यासाठी सर्व नोंदी तपासून मनोज जरांगेंचे समाधान करण्यावर सरकारचा भर असणार आहे. कुणबी म्हणून ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना आरक्षण देणे सरकारला सहज शक्य असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

SCROLL FOR NEXT