Mangaon Flyover Girder Work pudhari photo
ठाणे

Mangaon Flyover Girder Work : माणगाव बायपास उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम पूर्ण

वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार, पण उद्घाटनासाठी प्रतीक्षा कायम

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील प्रतीक्षेत असलेल्या माणगाव बायपासवर असणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच बायपास सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्याने माणगाव येथे महामार्गावर तासन्तास होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे, मात्र यासाठी आणखी किमान दोन-तीन महिने वाट पहावी लागणार आहे. एलएन इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी या बायपाससाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

गणेशोत्सव, दिवाळी, शिमगोत्सव, सुट्ट्यांचा कालावधी यामध्ये माणगाव येथे मोठी वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे प्रवासी पर्यटकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दोन महिन्यानंतर बायपास सुरू झाल्यास या वाहतूककोंडीतून मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. महामार्गावरील प्रवास हा अधिक वेळेत व गतीने होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातीलचिपळूणयेथील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू असून ३ नोव्हेंबरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी पूल खुला होणार आहे. हाच उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी कोसळला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती.

दरम्यान हा पूल आता पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणाऱ्या प्रवासी पर्यटक व कोकणवासीयांना शिमगोत्सवापूर्वीच काहीसा दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव व चिपळूण येथील मुख्य अभियंता वृषाली पाटील संबंधित ठेकेदार कंपनीचे अभियंता त्यांचे प्रशासन यांनी फ्लाय ओव्हरब्रिजच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे.

माणगाव बायपासच्या पूर्णत्वानंतर इंदापूर बायपासच्या कामालाही जानेवारी महिन्यात गती मिळणार आहे. जानेवारी महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर मेगा ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान इंदापूर बायपासचे काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुलाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव

नव्याने डिझाईन तयार करून बांधण्यात आलेला हा पूल सुरू झाल्यास चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर याच पुलाचा मार्ग पुढे थेट कापसाळपर्यंत वाढवण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मोठी मागणी आहे.

अपघात टळतील

दरम्यान पुलाच्या विस्तारीकरणामुळे महामार्गावर असलेल्या पाॅवर हाऊस परिसरात होणारे अपघात टळतील तसेच पादचाऱ्यांनाही महामार्ग क्रॉस करताना धोका होणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार या पुलाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून तयार करण्यात आला असून या प्रलंबित प्रस्तावाला बहादुरशेख नाका उड्डाणपुलाच्या पूर्णत्वानंतरच गती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT