नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील मलंगगडावर दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिधोकादायक झालेल्या श्री मलंगगडाच्या वाटेतील दोन ठिकाणांना प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने संततधार सुरू असल्याने दरडी कोसळण्याची भीती सर्वाधिक मलंगगडावर व्यक्त करण्यात येत आहे.
श्री मलंग गडावरील दुर्गा माता मंदिर व हॉटेल परिसरात प्लास्टिकने झाकलेल्या दरडी कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे परिसरात प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
श्री मलंगगडावर दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. नुकतीच दुर्गा माता मंदिराच्या पायथ्याशी एका हॉटेलमध्ये दरड कोसळली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र मलंगगडावर वाढत्या वनविभागाच्या जागेतील अतिक्रमण आणि रेती उपसा यामुळे सध्या नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
नागरिकांच्या जीवावर दरडी बेतण्याआधी तातडीने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. या धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या लावून उपाययोजना वेळीच करणे गरजेचे आहे. श्री मलंगगडावरील प्रामुख्याने दुर्गा माता मंदिर व पहिल्या समाधी मंदिराजवळ सर्वाधिक दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संततधारेत मलंगगडावर दरड कोसळण्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उपाययोजना करणे आवश्यक
दरड कोसळू नये म्हणून दुकानदारांनी थेट प्लास्टिकचा कापड गुंडाळला आहे. मात्र कोसळणार्या मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असल्याने भाविकांची संख्या श्री मलंगगडावर येण्याची लक्षणीय आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन कधी गांभीर्याने परिसरातील अतिधोकादायक दरडींकडे लक्ष देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.