Mahesh Aher Case Pudhari
ठाणे

Mahesh Aher Case: भोंदू खरातचे ठाणे कनेक्शन; पालिकेचा वादग्रस्त माजी अधिकारी महेश आहेरवर बलात्काराचा गुन्हा

खरातचा भक्त असलेला ठाणे महापालिकेचा वादग्रस्त अधिकारी महेश आहेर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महिला अत्याचार प्रकरणातील नाशिकचा भोंदू अशोक खरातचे ठाणे कनेक्शन आता समोर आले आहे. खरातचा भक्त असलेला ठाणे महापालिकेचा वादग्रस्त अधिकारी महेश आहेर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पालिकेच्या एका लिपिक महिलेला आहेर याने नाशिकला नेले, तिला बाबाचे दर्शन घडवले आणि नंतर अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कासारवडवली पोलीस महेश आहेर यांचा शोध घेत असून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आणि फोनला प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

महिलांचे लैंगिक शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. पाचव्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या खरातविरोधात आता ईडीची देखील एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे संबंध असल्याचे दावे-आरोप झाले आहेत.

नाशिकमध्ये पॉवरफुल असणाऱ्या अशोक खरातचे आता ठाणे कनेक्शन समोर आले आहे. अशोक खरातच्या ठाणे कनेक्शनमुळे प्रकरणात नवीन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नाशिकचा कथित भोंदू बाबा अशोक खरात आणि ठाण्यातील वादग्रस्त माजी अधिकारी महेश आहेर यांच्यातील धक्कादायक संबंध आता उघड झाले आहेत.

महेश आहेर हा केवळ खरातचा भक्तच नव्हता, तर त्याने ठाणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यालाही खरातच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ठाणे क्राईम ब्रांच आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

ठाणे महानगर पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ठाणे पालिकेतील एका लिपिक महिलेला विश्वासात घेऊन तिला अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयात नेले होते.

त्या महिलेची इच्छा नसतानाही, महेश आहेर आणि अशोक खरात यांनी संगनमताने पीडित महिलेवरून लिंबू फिरवून जादूटोणा सदृश प्रकार केला. इतकेच नव्हे, तर तिला जबरदस्तीने मोती हा खडा घालण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे पीडित महिलेला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असल्याचे तक्रारीत म्हणटाले आहे.

लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यता

ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त हे कार्यरत असताना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. त्यातच ते काही महिन्यापूर्वी पालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले. ठाण्यातील महिलेला नाशिकच्या खरातांच्या कार्यालयात नेल्याने महेश आहेर आणि भोंदू बाबा खरात यांच्यात आर्थिक आणि आध्यात्मिक संबंधांमुळे खळबळ उडाली आहे.

अशोक खरातच्या दरबारात ठाण्याचे आणखी किती पांढरपेशे लोक जात होते, याचा शोध आता क्राईम ब्रांच घेत आहे. या प्रकरणाने ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा महेश आहेर यांच्या कारनाम्यांची चर्चा सुरू झाली असून, लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महेश आहेर सध्या फरार

या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत असुन आरोपी महेश आहेर याचा सध्या फरार आहे. ठाणे पोलीस वादग्रस्त माजी अधिकारी आहेर याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली असून या माजी अधिकाऱ्याची संपूर्ण ठाणे पालिकेत दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात अत्याचार, विनयभंग, सन 2020 ते 2023 दरम्यान महिलेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याबाबत तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारीत भोंदूबाबा खरात यांच्या कार्यालयात नेल्याचे नमूद केल्याने या प्रकरणाचा सविस्तर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करीत आहे. खरात यांच्या कार्यालयात नेण्यात आलेल्या तक्रारदारांनी तक्रारी कराव्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-अमरसिंह जाधव, उपायुक्त ठाणे गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT