ठाणे / नाशिक : शाम धुमाळ
मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात रस्तादुरुस्तीसाठी तीन दिवसाचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र बुधवार (दि.26) रोजी महाशिवरात्री असल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वर, सर्वतीर्थ टाकेद या तीर्थस्थळी जाणाऱ्या हजारो शिव भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाशिवरात्री निमित्ताने जुना कसारा घाट प्रवासासाठी सुरु ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाशिवरात्री निमित्त भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम एक दिवसाकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवार (दि.27) रोजीपासून पुन्हा जुन्या कसारा घाटातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन सुरु करण्यात येणार आहे. तर रस्तादुरुस्तीसाठी तीन दिवसाचा ट्रॅफिक ब्लॉक गुरुवार (दि.27) रोजीपासून सुरु करण्यात येऊन कसारा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्से कसारा घाट बंद राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी राम होंडे, छाया कांबळे यांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जुना कसारा घाट बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे. दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओडिसीसारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस-वे च्या मार्गे वळविण्यात आली आहे.