Teacher Non Teaching Duties pudhari photo
ठाणे

Teacher Non Teaching Duties : शिक्षकाची नोकरी मात्र १५६ प्रकारची अशैक्षणिक कामे!

अतिरिक्त कामांच्या बोज्याने अध्यापनावर परिणाम; समायोजनाची प्रक्रियाही संथ

पुढारी वृत्तसेवा

ठाणे :शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त तब्बल १५६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीतील कामांपासून ते विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन नोंदी, पोषण आहार आणि आरोग्यविषयक जबाबदाऱ्यांपर्यंत अनेक कामांचा भार शिक्षकांवर पडत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मिळणारा वेळ कमी होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने अनेक शाळांतील शिक्षकांची कमतरता हा प्रश्नही कायम आहे.

राज्यात विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे दोन लाखांहून अधिक शिक्षक अतिरिक्त झाल्याचे सांगितले जात असून, या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षभरातही या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे चित्र आहे. उपलब्ध माहितीनुसार, दहा टक्के शिक्षकांचेही समायोजन पूर्ण झालेले नाही.

परिणामी, एका बाजूला काही शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोजा असताना दुसरीकडे काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. शिक्षकांचे समायोजन वेळेत न झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांमध्ये कुटुंबनियोजन सर्वेक्षण, मतदार यादी तयार करणे व अद्ययावत करणे, बांधकामविषयक कामे, शाळास्तरीय सर्वेक्षणे, विविध समित्यांची कामे, शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी, आरोग्यविषयक नोंदी, शिष्यवृत्तीशी संबंधित प्रक्रिया, जमा-खर्चाच्या नोंदी तसेच विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करणे आणि ऑनलाइन नोंदणी यांचा समावेश आहे.

या कामांसाठी शिक्षकांचा बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे अध्यापन, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि अध्ययन निष्पत्ती तपासणे यांसारख्या मूलभूत शैक्षणिक बाबींसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांकडून केली जाते.

दरम्यान, राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल, मराठी शाळांमधील घटती पटसंख्या आणि शिक्षकांची असमान उपलब्धता यांमुळे सरकारी शाळांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येत जवळपास २० टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले जाते. तसेच राज्यातील पाचशेहून अधिक शाळा शिक्षकांविना असल्याची माहितीही समोर येत आहे.

अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ देणे आणि शिक्षकांची रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे.

शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला, तर अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध होऊ शकतो. मात्र, त्याचबरोबर ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तेथे शिक्षक उपलब्ध करून देणे आणि समायोजन प्रक्रिया वेगाने पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या उद्दिष्टापुढे प्रशासकीय कामांचा आणि शिक्षकांच्या असमान उपलब्धतेचा अडथळा कायम राहण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या कामांमधून शिक्षकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संघटनांची मते जाणून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा भार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, केवळ अशैक्षणिक कामे कमी करून प्रश्न सुटणार नसून, शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता आणि त्यांचे योग्य समायोजन याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

शिक्षकांच्या माथी अशैक्षणिक कामांचा भार

  • निवडणुकीसंदर्भातील कामे : १०

  • बांधकामविषयक कामे : ५

  • शाळास्तरीय सर्वेक्षणे : ८

  • विविध समित्यांची कामे : १६

  • शालेय पोषण आहार योजना : १०

  • आरोग्यविषयक कामे : १०

  • शिष्यवृत्तीसंदर्भातील कामे : १५

  • जमा-खर्चाच्या नोंदी : १०

  • ऑनलाइन कामे : विद्यार्थ्यांची नोंदणी, आधार अद्ययावत करणे व माहिती भरणे.

  • इतर कामे : कुटुंबनियोजन सर्वेक्षण, मतदार यादी अद्ययावत व प्रशासकीय जबाबदाऱ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT