भिवंडी (ठाणे) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सन 2024-25 मध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी -2 (नियतकालिक मुल्यांकन चाचणी - 'अ') आयोजनाबाबत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार परीक्षा लवकर घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत आहे.
राज्यातील शाळांमध्ये मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उतरार्धात करण्यात आल्यामुळे विविध समस्या निर्माण होत असल्याने संकलित मुल्यमापन आणि चाचणीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेमार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
वार्षिक परीक्षा आणि निकालाबाबत संघटनेच्या वतीने दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे कि, 25 एप्रिल रोजी परीक्षा संपल्यानंतर 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लावणे खूप घाईचे होणार आहे. वार्षिक परीक्षांचे निकाल हे शाळेत कायमस्वरूपी जतन करून ठेवले जातात.
घाईघाईने 4 दिवसात निकाल बनवल्याने त्याच्यात चुका होऊ शकतात. विषयावार गुणांकन याद्या, संकलित निकाल पत्रक, नोंदवह्या, निकालपुस्तिका, गुणपत्रक, हजेरीपत्रक, इत्यादी कामे 4 दिवसात कशी पूर्ण होतील?असा प्रश्न शालेय व्यवस्थेला पडला आहे.शाळा शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच वार्षिक नियोजन तयार करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करत असतात. मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून 27 फेब्रुवारी, 2025 रोजी काढलेल्या पत्राने शाळांच्या वार्षिक नियोजनात व्यत्यय आणला आहे. तसेच इयत्ता 5 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी 2 प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील ही अट रद्द करावी आणि इयत्ता 5 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांना 2 वेळा परीक्षा देण्यापासून सवलत द्यावी,असे नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार शाळांना दिलेल्या पत्रान्वये प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकात अंशतः बदल करून झअढ व वार्षिक परीक्षा 15 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण होतील असे वेळापत्रक जाहीर करावे आणि राज्यभर उडालेला गोंधळ दूर करावा,अशी विनंती शिक्षण क्रांती संघटनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी लेखी पत्राद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांना केली आहे.