Maharashtra School Digital Education Pudhari
ठाणे

Maharashtra School Digital Education: डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा; पण २३ हजार शाळा अजूनही इंटरनेटविना!

डिजिटल शिक्षणासमोर पायाभूत सुविधांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: डिजिटल इंडिया, स्मार्ट क्लासरूम आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आधुनिकतेचे नवे पर्व सुरू झाल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे डिजिटल चित्र अद्याप पूर्णपणे आशादायी नाही.

राज्यातील हजारो शाळा आजही इंटरनेट, संगणक आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडीआयएसई २०२५-२६ अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास डिजिटल शिक्षणाचा विस्तार झाला असला, तरी त्याचा लाभ सर्व शाळांपर्यंत समानपणे पोहोचलेला नसल्याचे स्पष्ट होते.

राज्यातील एकूण १ लाख

८ हजार १३९ शाळांपैकी ९० हजार ४१९ शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी ८४ हजार ५३० शाळांमधील संगणकच प्रत्यक्ष कार्यरत आहेत. म्हणजेच उपकरणे उपलब्ध असूनही हजारो शाळांमध्ये त्यांचा वापर होत नाही. दुसरीकडे, ८४ हजार २८४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असली, तरी तब्बल २३ हजार ८५५ शाळा अजूनही इंटरनेटपासून वंचित आहेत. त्यामुळे डिजिटल शिक्षणाच्या धोरणात्मक घोषणा आणि ग्रामीण भागातील शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र समोर आले आहे.

विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांसमोर ही समस्या अधिक गंभीर आहे. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कची उपलब्धता मर्यादित असल्याने इंटरनेट जोडणी असूनही त्याचा प्रभावी वापर करता येत नाही.

काही शाळांमध्ये इंटरनेटसाठी स्वतंत्र निधी नसल्याने शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्य दाखवावे लागते. दरम्यान सदरची ही परिस्थिती डिजिटल शिक्षणाच्या धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

वीजपुरवठ्याविना स्मार्ट क्लासरूम कशा चालणार?

डिजिटल शिक्षणासाठी संगणक आणि इंटरनेटइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे अखंडित वीजपुरवठा. राज्यातील ९३ हजार ९९९ शाळांमध्ये कार्यरत वीजपुरवठा असल्याची नोंद आहे. मात्र, ३ हजार २०१ शाळांमध्ये अद्याप वीज जोडणीच नाही, तर १० हजार ९३८ शाळांमध्ये वीज जोडणी असूनही वीजपुरवठा कार्यरत नाही.

यामुळे या शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही आणि डिजिटल बोर्ड यांसारख्या उपकरणांचा नियमित वापर करणे शक्य होत नाही. अनेक शाळांमध्ये डिजिटल उपकरणे उपलब्ध असली, तरी वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे ती वापराविना पडून असल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिजिटल शाळा उभारण्याबरोबरच वीजपुरवठ्याची शाश्वत व्यवस्था करणे गरजेचे आहे.

प्रत्येक शाळेतील संगणक, इंटरनेट आणि वीजपुरवठ्याची नियमित तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. बंद पडलेल्या संगणकांची तातडीने दुरुस्ती, इंटरनेटसाठी स्वतंत्र वार्षिक निधी, शिक्षकांना डिजिटल प्रशिक्षण आणि ग्रामीण भागात सक्षम नेटवर्क उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्याचबरोबर डिजिटल उपकरणांच्या वापराचा नियमित आढावा घेणेही आवश्यक आहे.

डिजिटल शिक्षणात समान संधीचे आव्हान

डिजिटल शिक्षण ही केवळ आधुनिकतेची संकल्पना नसून भविष्यातील रोजगार, कौशल्यविकास आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेशी जोडलेली गरज आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील ज्ञानस्रोत उपलब्ध होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत डिजिटल सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही शैक्षणिक विषमता अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT