ठाणे

महाराष्ट्र पोलिसांचा दक्षिण आफ्रिकेच्या कॉम्रेडमध्ये डंका

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी डेस्क : जगभरात खडतर समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केली. पहिल्यांदाच या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आयपीएस कृष्णप्रकाश, मुंबईचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पिंपरी- चिंचवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे सहभागी झाले होते. या तिन्ही अधिकाऱ्यांनी उंच ५ पर्वतरांगा पार करत १२ तासांत खडतर स्पर्धा पूर्ण केली.

गुन्ह्यांची उकल असो वा क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र पोलीस दल कायम अव्वल असल्याचे वारंवार समोर आले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी देश-विदेशातील विविध क्रीडा प्रकारात आजवर सहभाग घेतला मात्र, दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धेत (अल्ट्रा मॅरेथॉन) सहभाग घेतला नव्हता. यंदा स्पर्धेच्या १०० व्या वर्षांचे औचित्य साधून फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, मुंबईच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे पोनि वाहिद पठाण, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे सपोनि राम गोमारे सहभागी झाले. या स्पर्धेसाठी जगभरातील २५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

ही स्पर्धा पाच टप्प्यात विभागण्यात आली असून १५ तासांत स्पर्धा पार करण्याची अट आहे. पाच टप्प्यातील स्पर्धेदरम्यान ५ पर्वतरांगाचा खडतर प्रवास पार करण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली होती. त्यानुसार आयपीएस कृष्णप्रकाश यांनी १० तास १५ मिनिटांत, पोनि वाहिद पठाण यांनी ११ तास ३१ मिनिटं तर सपोनि राम गोमारे यांनी ११ तास १९ मिनिटांत स्पर्धेतील खडतर टप्पे पार केले.

१० अंश तापमानात थरार

१० अंश तापमानात आयोजित केलेल्या या स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वतंत्र दक्षिण आफ्रिकेची स्थापन झाली त्यावेळी ५ नागरिक धावले होते. त्या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा पीटरमॅनेजबर्ग ते डरबन या ८९ किमी अंतरादरम्यान पार करायची होती. सदर स्पर्धा ठराविक वेळेपूर्वी पूर्ण करून तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारतीय ध्वज फडकवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT