ठाणे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका संपताच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर ठाणे, मुंबईसह 28 महापालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये घेतल्या जाणार असून, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. पुणे जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढविण्याचा विषयही समोर आल्याने या निवडणुका रंगतदार होण्याचे संकेत मिळतात. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता असून, महापालिकांच्या एकूणच निवडणुकांना मिनी विधानसभा, असेही संबोधले जात आहे. राष्ट्रीय नेतेही या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.
विकासकामांच्या उद्घाटनाची लगबग
आचारसंहितेपूर्वी सर्व विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याची गडबड प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. महिनाभरात आचारसंहिता कधीही लागू शकते, हे लक्षात घेऊन उद्घाटने उरकून घ्यावीत, असे नियोजन करण्याच्या सूचना सत्ताधारी आमदार आणि काही मंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिल्याने कामे मार्गी लावण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येते.