Bomb Threat Security Alert Maharashtra
पुढारी ऑनलाईन : राज्यातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी (दि. २) पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. ठाणे, परभणी, रत्नागिरी, राजापूर आणि अमरावती येथील न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांनंतर संबंधित जिल्ह्यांतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाणे न्यायालयाला सोमवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. ठाणेनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी न्यायालय परिसरात बंदोबस्त वाढवून बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालयाची इमारत रिकामी केली. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून इमारतीची कसून तपासणी करण्यात आली.
परभणी जिल्हा व सत्र न्यायालयालाही धमकीचे ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढविली. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त तैनात करून बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडकडून परिसराची तपासणी करण्यात आली. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन अग्निशामन दलालाही पाचारण करण्यात आले.
अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी न्यायालयाची इमारत उडविण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि कमांडो पथकाने इमारतीच्या चारही मजल्यांची तपासणी केली. या प्रकारामुळे न्यायालयीन कामकाजही ठप्प झाले.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने राजापूरच्या प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी केली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने पाठविलेल्या निनावी ई-मेलमध्ये दुपारी ३.१५ वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच न्यायालय प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
न्यायालय प्रशासनाला धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस नियंत्रण कक्षासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांच्या विविध पथकांनी तातडीने न्यायालय परिसर गाठला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.