दिलीप शिंदे
ठाणे : देशातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरू आहे. त्याअनुषंगाने ठोस पाऊले टाकत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सन 2025-26 या वर्षांत देशभरात एमबीबीएस पदवीच्या 11 हजार 500 नवीन जागा वाढवून 44 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी 5 नवीन महाविद्यालये आणि 980 अतिरिक्त वैद्यकीय जागांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊन दरवर्षी 12 हजार 824 नवीन एमबीबीएस डॉक्टर रुग्ण सेवा बजावण्यास सज्ज होतील.
देशभरातील ग्रामीण आणि शहरातील आरोग्य सेवा अधिक सद़ृढ बनविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय शिक्षण सक्षम करण्यावर भर दिली आहे. देशभरात 44 नवीन महाविद्यालये आणि अन्य महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 11 हजार 500 अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात आल्याने सन 2025- 2026 या वर्षामध्ये 819 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1 लाख 29 हजार 250 जागा झाल्या आहेत. तर नूतनीकरणाच्या वेळी काही गंभीर कारणास्तव काही महाविद्यालयांत एमबीबीएसच्या 456 जागा कमी करण्यात आलेल्या आहेत.
सन 2024-25 या वर्षात देशभरात एमबीबीएसच्या 1 लाख 17 हजार 750 जागा होत्या. एमबीबीएसच्या वाढलेल्या जागांमध्ये सर्वाधिक 1500 जागा या कर्नाटकमध्ये वाढल्या असून, दुसर्या क्रमांकाच्या 980 अतिरिक्त जागा या महाराष्ट्रातील आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 900, तामिळनाडू 850 आणि पश्चिम बंगाल राज्यात 800 जागा वाढलेल्या आहेत. दुसरीकडे नव्याने मंजुरी मिळालेल्या 44 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक 6 महाविद्यालये ही राजस्थान आणि महाराष्ट्रात 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत.
त्यामध्ये महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज, पनवेल, ईएसआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंधेरी मुंबई, श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज, कोपरगाव, नगर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, नवी मुंबई आणि मालती मल्टिस्पेशालिटी अँड मेडिकल कॉलेज, तुरखेड, अकोला या नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच राज्यभरातील आठ महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 580 वाढीव जागांना मंजुरी देण्यात आल्याने राज्यात 12 हजार 824 एमबीबीएस डॉक्टर तयार होणार आहेत.