Thane Cluster Redevelopment pudhari photo
ठाणे

Madhavi Naik : क्लस्टर प्रकल्पात रहिवाशांना स्वेच्छेचा पर्याय द्या

आमदार माधवी नाईक यांची विधान परिषदेत मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या ४४ क्लस्टर प्रकल्पांमध्ये सहभागासाठी रहिवाशांवर सक्ती न करता रहिवाशांना स्वेच्छेचा पर्याय ठेवावा. तसेच ४०० ते ५०० सदस्यसंख्या असलेल्या जुन्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्याबरोबरच, क्लस्टर प्रकल्पाला वेग देण्यासाठी वेळप्रसंगी नियम शिथिल करावेत, अशी आग्रही मागणी भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होऊन आ. ॲड. माधवी नाईक यांनी ठाणे शहरातील क्लस्टर, अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत भूमिका मांडून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच या कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.

क्लस्टर प्रकल्पातील काही नियमांबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. क्लस्टर प्रकल्प जाहीर झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांवर सामूहिक विकास प्रकल्पात सहभागासाठी दबाव येतो. त्याऐवजी क्लस्टर प्रकल्पात सहभागासाठी रहिवाशांची इच्छा विचारात घ्यावी, अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे, असे नमूद करीत ठाणे शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याकडे लक्ष वेधले. तसेच क्लस्टर प्रकल्पात समाविष्ट असलेल्या जुन्या गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकास किंवा पुनर्विकासासाठी स्वातंत्र्य देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली `एमएमआरडीए' क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, मुंबईबरोबरच ठाणे जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ठाणे-बोरिवली भुयारी बोगद्यामुळे वाहतूककोंडी संपुष्टात येईल. देशातील सर्वात मोठ्या मेट्रो कॉरिडॉरमधील मेट्रो ४ व मेट्रो ५ प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी आणि मुंबईच्या दळणवळणाला नवी दिशा मिळेल. त्यातून वेगवान, सुरक्षित आणि सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल.

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग व बोगद्यामुळे शीळफाटा परिसरातील वाहतूककोंडी कमी होईल. माणकोली-मोठा गाव पूल हा डोंबिवलीकरांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पांबरोबरच ठाण्यातील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील पायाभरणीच्या कामालाही वेग आला आहे, याबद्दल आमदार ॲड. माधवी नाईक यांनी समाधान व्यक्त केले. ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो हा प्रकल्प ठाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, त्याबाबत नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी प्रशासनाने वेळ द्यावा,असे आवाहनही आमदार ॲड. माधवी नाईक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT