NSG Operation Pudhari
ठाणे

NSG Operation: मिरा-भाईंदरमध्ये मोठी दुर्घटना टळली! उत्तनमध्ये सापडलेला जिवंत तोफगोळा एनएसजी, पोलिसांनी केला निकामी

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात एक मोठी दुर्घटना टळली आहे. या परिसरात जुन्या काळातील एक जिवंत तोफगोळा आढळून आला होता. मात्र, मिरा-भाईंदर पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी ) यांनी अत्यंत सतर्कता दाखवत संयुक्त कारवाईद्वारे हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि एनएसजी च्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक संशयास्पद धातूचा गोळा स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक तपासणीत ती कोणतीही साधी वस्तू नसून एक अविस्फोटित स्फोटक सामग्री (तोफगोळा) असण्याची शक्यता पोलिसांना वाटली. . मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एनएसजीच्या तज्ज्ञांनी विशेष तांत्रिक प्रक्रियेचा वापर करून हा जिवंत तोफगोळा सुरक्षितपणे निकामी केला.

हा तोफगोळा अविस्फोटित स्फोटक सामग्री प्रकारातील असल्याचा निर्वाळा तपासानंतर देण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

एनएसजी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमता विकास उपक्रमांतर्गत अलीकडेच मिरा-भाईंदर पोलिसांना आयईडी आणि विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटविण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. याच प्रशिक्षणामुळे स्थानिक पोलिसांनी संभाव्य धोका वेळेत ओळखला आणि तात्काळ पावले उचलली.

मिरा-भाईंदर पोलिसांची प्रसंगावधानता आणि एनएसजी च्या तत्परतेमुळे उत्तनमधील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हा जिवंत तोफगोळा या ठिकाणी कधी पासून आहे, कधी वापरण्यात आला होता याचे संशोधन होणे आवश्यक आहे. याबाबत जनतेत भितीचे वातावरण पसरले होते, तसेच जनजागृती होणे आवश्यक.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कुठेही कोणतीही संशयास्पद किंवा जुनी धातूची वस्तू आढळल्यास तिला स्वतः हात लावू नये अथवा हलवण्याचा प्रयत्न करू नये. अशा वस्तूंबाबत त्वरित स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून तज्ज्ञांमार्फत तिची योग्य तपासणी करून पुढील धोका टाळता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT