file photo
ठाणे

शगुन!

पुढारी वृत्तसेवा

ज्योती मुळ्ये

बहेन कैसी है? अच्छी है ना? आवाज अचानक वेगळा वाटला म्हणून खाली मान घातलेल्या अवस्थेत फक्त नजर थोडीशी उचलली तर समोर केशरी साडीच्या व्यवस्थित पिन केलेल्या निर्‍या दिसल्या. कोण असेल ही हिंदी बोलणारी बया, अंदाज येईना. बरं, व्यक्ती आणि आवाजही मॅच होईना.. उत्सुकतेसरशी मी झटकन डिकी बंद करून वर बघितलं. केशरी साडीतली एक तृतीयपंथी व्यक्ती अगदी हसर्‍या चेहर्‍याने माझ्या दुचाकीपलीकडे उभी होती. अंगाने थोराड... रंगाने काळी... चापूनचोपून नीट बसवलेली साडी, केसांचा घट्ट आंबाडा त्यावर फुलं माळलेली... कानात चमकणार्‍या गिलिटची सोनेरी कुडी, गळ्यात तसलीच चमकती सोनेरी मण्यांची बोरमाळ... ओठांवर चोपडलेली भरपूर लाली आणि चेहरा प्रचंड राकट, राबस, खरबरीत, दहशत बसावी असा... पण, याक्षणी चेहर्‍यावर मनापासून उमटलेलं दिलखुलास हसू... त्यामुळे तो चेहरा हळुवार, ‘आपला’ झालेला... आणि त्यावरचं ते हसू इतकं ‘आतून’ आलेलं की माझ्या चेहर्‍यावरही आपोआप हसू उमटलं... सगळं विसरून!

सगळं विसरून हे त्यातलं सर्वात जास्त महत्त्वाचं! कारण एरव्ही अशी व्यक्ती लांबवर जरी दिसली तरी माझी दातखीळ बसते... डोळे गच्च बंद होतात.. आणि तोंडून आपसूक किंचाळी निघते... घाबरून... मी थरथरत असते... लहानपणापासून माझ्या मनावर कोरलेली दहशत आहे ही. माणसांत असूनही माणसाचं आयुष्य वाट्याला न येणार्‍या या जीवाविषयी समजायला लागल्यावर कितीही कणव, आत्मीयता, आपुलकी, माया वाटली तरी ती मनातूनच! प्रत्यक्ष समोर आल्यावर माझी ‘पाचावर धारण’ ठरलेली! मुंबईत सिग्नलला गाडी थांबली की यांचं वस्कन अंगावर येणं इतकं दबा धरून बसलंय की अनेकदा बंद गाडीतही मी नकळत स्वतःला आक्रसून घेतलंय. एवढी भीती का, कशी, कधी बसली याचं माझ्याकडे उत्तर नाही, पण होतं हे आजवर असंच होतं.आणि अशी मी, आज या ‘केसरिया’ समोर शांतपणे हसत उभी आहे हेच माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. मला स्तिमित करणारं!

त्यानं चटकन पर्समधून दोन रुपयांचं नाणं काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं. ये शगुन रख, भाई की तरफ से, रक्षाबंधन का... मी अवाक्! आता माझ्या चेहर्‍यावरचं हसू अधिक मोकळं झालेलं, अधिक आपुलकीचं! पण... याने या वाहत्या रस्त्यावर मलाच का निवडावं? समजेना... काही टोटल लागेना... क्षणात मनात कल्लोळ माजला. अनेक घंटा किणकिणल्या.. का, माहीत नाही पण त्याक्षणी माझी श्रद्धास्थानं, माझा देव, माझ्या प्रिय व्यक्ती मनात चमकून गेल्या... चांगुलपणावरचा विश्वास मनाच्या काठावर आला आणि मन शांत झालं! आयुष्यात पहिल्यांदाच खूप मायेने बघितलं मी ‘केसरिया’कडे!

अभी है ना, वैसेही हमेशा खुश रहेनेवाली है तू... अभी तेरे दिल मे जो भी है ना, सब मिलनेवाला है तुझे... भगवान संभालकर रखेगा तुझे त्याच्या दुवा घेऊन मी तृप्त! अनमोल खजिना जपावा तसं ते नाणं मी वॉलेटमध्ये जपून ठेवलं.

बहेन, भाई को कुछ नही देगी? आता त्याचे डोळे आर्त, ओशाळलेले! मला बघवलं नाही. त्याच्या डोळ्यातले करुण भाव पाहायचं धाडस माझ्यात नव्हतं. मी नजर झुकवली आणि झटकन पन्नास रुपये त्याच्या हातावर ठेवले. ती पन्नास रुपयांची नोट हातात घट्ट धरून तो जवळच्या टपरीवर गेला... मी गाडीला स्टार्टर मारला... दो वडापाव, एक कटिंग... समोरून पास होताना त्याचे शब्द माझ्या मनात कल्लोळ माजवून गेले... टीचभर पोटासाठी काय काय करतो माणूस... पोटातल्या आगीसाठी किती अगतिक व्हावं लागतं माणसाला नाती जोडावी लागतात, प्यार के दो मीठे बोल बोलावे लागतात... म्हणूनच तो मला बहीण म्हणाला असेल... असेलही! पण दोन रुपये माझ्या हातावर ठेवताना त्याच्या डोळ्यातली आपुलकी खोटी नव्हती... कुणालाही ‘तुझं भलं होईल’ हा आशीर्वाद आपण रिकाम्या मनानी नाही देऊ शकत. त्यासाठी माणुसकीचा, आत्मीयतेचा झरा लागतोच कुठेतरी तळाशी... हे संचित त्याच्यापाशी नक्की होतं. मी काही देईन याची खात्री नसताना त्याच्या फाटक्या झोळीतून मला मिळालेला ‘शगुन’ तर मौल्यवान आहेच... पण माझ्या मनातली वर्षानुवर्षांची दहशत अलगद मालवून ‘त्या’नं त्याच्यासारख्या कित्येक केसरियांसाठी रुजवलेलं प्रेम आणि बंधुत्व सर्वात अमूल्य आहे!

आयुष्यभराचा ‘शगुन’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT