मुरबाड शहर : गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून, तालुक्यातील कोरावळे येथील शेतकरी जैतू नथु धुमाळ यांच्या मालकीच्या शेतावरील गोठ्यात बिबट्याने हल्ला करून सहा बकऱ्या जागीच ठार केल्या. तर अन्य काही बकऱ्या ओढून नेल्याचे ठसे आढळून आले आहेत.
ही घटना दशनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या जंगलमाफियांच्या वनसंपदेच्या तस्करीमुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून, त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतीच जामघर परिसरात नीलगाय मृतावस्थेत आढळली असताना, आता बिबट्याच्या हल्ल्यात एकूण 8 बकऱ्या मृत झाल्या असून त्यामध्ये 6 नर व 2 मादी बकऱ्यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे शेतकरी जैतू नथु धुमाळ यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मृत बकऱ्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी पीडित शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण वनविभागाकडून मदत न मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.