नेवाळी / खडवली : वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यात नागरिकांकडून थंड पेयांना पसंती दिली जात आहे. मात्र सर्वाधिक पसंती असलेल्या लिंबू सरबताने यंदा उन्हाच्या झळांच्या कालखंडात भाव खाल्ला आहे. किरकोळ बाजारात लिंबू पाच रुपयांना झाला असल्याने सरबत देखील वीस रुपयांना झाले आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये खवय्यांना ताटात येणारा लिंबू गायब झाले आहे. डोंबिवली अंबरनाथ महामार्गावर असलेल्या लिंबू सरबतच्या टपर्यांवर दरवाढ झाल्याने नागरिकांनी लिंबू सरबतकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाने 35 अंशाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शरीरातील ऊर्जेच्या पातळीच समतोल राखण्यासाठी लिंबू सरबतला पसंती दिली जात आहे. मात्र सोमवारपासून किरकोळ बाजारात लिंबूचा दर पाच रुपये झाल्याने सरबत वीस रुपये ग्लास झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी दहा रुपयांना चार मिळत होते. पण आता पाच रुपयांप्रमाणे एक लिंबू बाजारात विक्री होत आहे. तर काही ठिकाणी लिंबू दहा रुपयांना एक देखील मिळत आहे. लिंबाच्या भावाने उसळी घेतल्याने शेतकर्यांना यांचा फायदा होणार आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान, उन्हाळ्यात लग्नसराईमुळे भाजीपाल्याच्या भावात वाढ होते. यंदा मात्र भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत. विशेषत: पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मेथी पंचवीस रुपये, पालक पंधरा, शेपू वीस, कोथिंबीर पंधरा रुपयांना जुडी मिळते. वांगे, दोडके 20 रुपये पाव किलो आहेत. भाव खाणारा टोमॅटोही आता 30 रुपये किलोने मिळत आहे. काकडी 30 ते 40 रुपये किलो आहे.
सध्या वातावरणात उष्णता वाढल्याने कल्याण बाजारपेठेत फळे उसाच्या रसाबरोबर लिंबू पाणी व लिंबू सरबतांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबाचीही मागणी वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. तसेच घाऊक बाजारात लिंबू 150 ते 175 रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर किरकोळ बाजारात एका लिंबासाठी 8ते 10 रु. मोजावे लागत आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचा तोरा वाढत आहे. लिंबाचा दर पाहता उन्हाळा संपेपर्यंत हेच चित्र बाजारात असणार असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा, यासाठी नागरिक शीत पेयाला पसंती देतात. यात विविध फळांचे ज्यूस, आईस्क्रीम, उसाचा रस, मिल्क शेक, फालुदा यांच्या मागणीत वाढ झाली आहे. घरात लिंबू आणि कोकम सरबताची सध्या चलती आहे. तर नारळ पाणी मात्र महाग झाले आहे. पन्नास रुपयांना मिळणारे नारळपाणी आता 60 ते 70 रुपयांना मिळत आहे.