डहाणू : डहाणू तालुक्यातील चिकूसाठी प्रसिद्ध असलेल्या बोर्डी गावात आता लक्ष्मण फळांचेही (Lakshman Phal Fruit) उत्पादन घेतले जात आहे.
बाजारात दुर्मिळ असलेल्या या औषधी गुणधर्मयुक्त फळांपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून त्यांची विक्री मुंबई, दिल्लीसह परदेशातही केली जाते. आयटी विषयात एमएससी शिक्षण घेतलेल्या प्राची नील सावे यांनी हा वेगळा मार्ग निवडून, स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
फळ प्रक्रिया उद्योगात रस असलेल्या प्राची सावे यांना लक्ष्मण फळ बाजारात अनोळखी असतानाही, या फळांची शेती करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी लक्ष्मण फळाबद्दल ऐकले होते. त्यानंतर त्यांनी या फळाचे उत्पादन घेऊन फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचे ठरवले. लग्नानंतर सासरी बोर्डी येथे आल्यावर, त्यांनी नवर्याच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने दक्षिण भारतातून लक्ष्मण फळाची रोपे आणून गावात लागवड केली.
लक्ष्मण फळाला इंग्रजीत सॉरसॉप म्हणून ओळखले जाते. हे फळ सीताफळ वर्गातील असून, चवीला आंबटगोड लागते. भारतात अंदमान, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू येथेही याचे उत्पादन घेतले जाते. औषधी गुणधर्मामुळे परदेशातही या फळाला मोठी मागणी आहे. निचरा होणारी वालुकामय किंवा चिकणमातीत झाडे चांगली वाढतात. चौथ्या वर्षी एक झाड 43 किलो, तर आठव्या वर्षी 80 किलोपर्यंत उत्पादन देते.