बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवारांच्या यादीत किसन कथोरे यांचेच वर्चस्व राहिल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कपिल पाटील समर्थकांना उमेदवारी न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांनी शेवटच्या अर्धा तास उरला असताना शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. इतकच नाही तर यापूर्वी माजी नगरसेवक हेमंत चतुरे आणि अविनाश भोपी यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेतील भाजपच्या यादीवर किसन कथोरे यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
समर्थकांना उमेदवारी मिळण्यात कोणताही अडसर झाला नाही. प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे आणि संजय भोईर यांच्यात सर्वसाधारण जागेसाठी अटीतटीचे स्पर्धा होती. मात्र शेवटच्या क्षणी संभाजी शिंदे यांना उमेदवारी अर्ज उमेदवारी जाहीर झाल्याने संजय भोईर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.
कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार कपिल पाटील यांचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे किसन कथोरे यांच्या गोटात अस्वस्थता होती. रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना कथोरे आणि पाटील एकत्र आले होते. मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद टाळत उमेदवारी अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्षात कथोरे विरुद्ध पाटील यांच्यात असलेल्या काटशहाचा पुढचा अंक बदलापूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची उमेदवारी यादी अंतिम करताना स्पष्टपणे जाणवला.
काटशहाचा फटका उमेदवारांना
यापूर्वी भाजपमधून तीन नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. हे तीनही नगरसेवक कपिल पाटील यांचे खंदे समर्थक होते. कथोरे विरुद्ध पाटील, या काटशहाच्या राजकारणात भाजपाच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपचेच कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत.