क्रांतिसूर्य वासुदेव बळवंत फडकेंची ध्यानगुंफा आजही अज्ञातवासात pudhari photo
ठाणे

Phadke meditation cave : क्रांतिसूर्य वासुदेव बळवंत फडकेंची ध्यानगुंफा आजही अज्ञातवासात

इंग्रजांना भारतातून चले जाव...चा आदेश देण्याच्या ऐतिहासिक घटनेला 9 ऑगस्ट रोजी 83 वर्षे पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बजरंग वाळुंज

इंग्रजांना भारतातून चले जाव...चा आदेश देण्याच्या ऐतिहासिक घटनेला 9 ऑगस्ट रोजी 83 वर्षे पूर्ण झाले आहेत. शनिवारी ऑगस्ट क्रांतीदिन सर्वत्र होत असतानाच 1879 सालात वयाच्या 34 व्या वर्षी क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारे वासुदेव बळवंत फडके यांचे कल्याण-डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या नेतिवलीच्या भुईडोंगरीवरील स्मृतीस्थळ अद्यापही उपेक्षित राहिले आहे. कल्याण-डोंबिवलीच्या जवळपास अगदी सीमेवर असलेल्या डोंगरावरील गुहेत बसून याच वासुदेव फडके यांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले ती गुंफा आजही अज्ञातवासात आहे.

आतापर्यंत जेवढी सरकारे आली त्या सर्व सरकारांचे वासुदेव फडके यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भुईडोंगरीवरील स्मृतीस्थळाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. आद्य क्रांतिकारकाच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून तेथे साधी दिवा-पणतीही तिथे लावली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील देशप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वासुदेव बळवंत फडके यांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये नेतिवलीच्या भुईडोंगरवरील गुंफेत वास्तव्य केल्याचे जुने कल्याण-डोंबिवलीकर सांगतात. फडके यांचे आजोळ म्हणजे कल्याणचे बोरगांवकर. याच बोरगावकर वाड्यात वासुदेवांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे कल्याणचा परिसर त्यांच्या पायाखालचा होता. भुईडोंगरीच्या गुंफेतून संपूर्ण कल्याण-भिवंडीचा टापू दिसतो. आज रोजी या गुंफेची अवस्था बिकट आहे.

वाढत्या नागरीकणाचा फटका भुईडोंगरीलाही बसत आहे. हा डोंगर ढळत चालला आहे. झोपडपट्ट्यांचा आणि विशेषतः समाजकंटकांचा विळखा या डोंगरपट्ट्याला पडला आहे. अशा या भुईडोंगरीवरील गुंफेत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा बसविण्यात आली आहे. 2003 सालात डोंबिवलीत राहणार्‍या तत्कालीन नगरसेविका सुधाताई साठे यांना वासुदेवांच्या ध्यान-गुंफेसंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी प्रभाकर पाठक, तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील, पद्माकर कुलकर्णी, कचोरे गावचे तत्कालीन सरपंच फकिरा चौधरी यांच्यासमवेत जाऊन पाहणी केली.

या गुंफेचा कब्जा एका समाजकंटकाने घेतला होता. तेथून त्याला हुसकावून लावण्यात आले. प्रभाकर पाठक यांनी गुहेत क्रांतीवीर वासुदेव फडके यांची प्रतिमा स्थापन केली. त्यानंतर सुधाताईंनी भुईडोंगरीचे प्रेक्षणीय स्थळ बनवावे, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT