Konkan coastal erosion | कोकणातील किनारपट्टीची धूप ठरतेय धोकादायक; हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचे संकट गडद 
ठाणे

Konkan coastal erosion | कोकणातील किनारपट्टीची धूप ठरतेय धोकादायक; हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचे संकट गडद

ठोस उपाययोजना नसल्याने परिस्थिती गंभीर वळणावर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कोकणला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. मात्र, या किनारपट्टीची होणारी धूप धोकादायक ठरत आहे. यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचे संकट अलीकडच्या दहा वर्षांत अधिक गडद झाले आहे. रायगड जिल्ह्यात शहापूर धेरंडपासून श्रीवर्धनपर्यंत अनेक ठिकाणी ही समस्या जशी जाणवते तशीच रत्नागिरी सिंधुदुर्गातही अनेक किनार्‍यांवर समुद्र उधाणाचा फटका बसत आहे. किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर वाळू बाहेर काढली जात असल्याने हे प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणामही यामध्ये असल्याचे संशोधकांचे मत आहे.

शासनाने किनारी भागांची धूप रोखण्यासाठी कोस्टल सेंटिमेटल सेल सुरू करण्याची भूमिका घेतली. यासाठी कांदळवन संवर्धन हाही एक महत्त्वाचा विषय होता. कांदळवन संवर्धन करून समुद्रांच्या लाटांपासून त्या भागांचे संरक्षण करता येते, हे पूर्वापार आपण पाहत आलो आहोत. कांदळवनांमुळे मत्स्य बीज संरक्षण होते. दुसर्‍या बाजूला लाटा कांदळवनात जोरदार आदळल्या तरी त्याचा पुढे येण्याचा वेग कमी होतो. हा मुद्दा लक्षात घेऊन कोकणात कांदळवने संरक्षण मोहिमेला गती देण्यात आली. मात्र, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा मुद्दा हा जागतिक पातळीवरचा आहे. तथापि, त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसू लागला आहे.

कोकणात जवळपास दीड हजार वस्त्या या समुद्र उधाणाच्या कक्षेत आहेत. त्यांचे संरक्षण कसे करता येईल, यावर तेवढ्या गांभीर्याने विचार झालेला नाही. परिणामी, घोंगावणारे हे संकट वर्षागणिक तीव्र होताना दिसत आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्राच्या येणार्‍या लाटा साडेचार ते पाच मीटर उंचीच्या असतात. त्यामुळे अनेकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असतो. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्याचे निरीक्षण भरती मापकांच्या अहवालातून अनेकदा पुढे आले आहे. 1987 ते 2024 पर्यंत समुद्राच्या पातळीत 4.44 सेंटिमीटरने वाढ झाल्याचे सांगितले गेले. मुंबई क्लायमेटच्या अभ्यासानुसार मुंबई, कोकणसह 11 भारतीय किनारे पुढील तीन दशकांत काही प्रमाणात अडचणीत येतील. कारण, याच भागामध्ये 1 ते 3 मीटरने समुद्राच्या पाण्याची उंची वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ आणि किनारी धोक्याचे पुरावे

समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे खारे पाणी भूजल साठ्यांमध्ये आणि ड्रेनेज सिस्टीममध्ये जाईल. यामुळे पाया, रस्ते आणि सांडपाणी नेटवर्क गंजतील. क्षारयुक्त पाण्यामुळे किनारी भागांसाठी देखभाल खर्च आधीच वाढला आहे. दक्षिण मुंबईचा बराचसा भाग पुनर्प्राप्त बेटांवर वसलेला आहे. वाढत्या समुद्र आणि लाटांच्या हालचालींमुळे किनार्‍यावरील धूप वाढू शकते. यामुळे समुद्र संरक्षण कमकुवत होऊ शकते.

महत्त्वाचे मुद्दे

1987 ते 2021 दरम्यान मुंबईभोवती समुद्रपातळीत

4.44 सेंमी वाढ झाली

15 भारतीय किनारी शहरांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे.

3.15 मिमीने मुंबईत दरवर्षी सरासरी समुद्रपातळी वाढत आहे.

30 वर्षांत मुंबईसह 11 भारतीय किनारी शहरांत समुद्रपातळी

0.1 ते 0.3 मीटरने वाढण्याचा अंदाज

2050 पर्यंत मुंबई, चेन्नई व कोचीमध्ये समुद्रपातळी 0.10.3 मीटरने वाढू शकते

3 सेमी दर दशकाला भारताच्या प. किनार्‍यावर समुद्रपातळी वाढ आहे.

57 सेंमीपर्यंत जाऊ शकतो हा दर तापमानवाढ कायम राहिल्यास

2050 पर्यंत मुंबईत भरती-ओहोटी व मुसळधार पावसामुळे दीर्घकालीन पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT