खाडी गिळतेय, मासेमारी संपतेय  pudhari photo
ठाणे

Koli community livelihood crisis : खाडी गिळतेय, मासेमारी संपतेय

कोळी समाजाच्या उपजीविकेवर ‘विकासा’चं काळं वादळ

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणार्‍या कोळी समाजाच्या उपजीविकेला विकासाच्या नावाखाली मोठा धक्का बसत आहे. खाडी व खाजण क्षेत्रांमध्ये झपाट्याने चाललेल्या शहरविकास, बंदर प्रकल्प, खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे. त्यामुळे शतकानुशतक चालत आलेला कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, रोजगाराचा मुख्य आधार हिरावला जात आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय कोळी समाज (नोंदणीकृत), दिल्लीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण 2020 चा संदर्भ देत, पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्याच्या मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, खाडी किनार्‍यावर वास्तव्यास असलेल्या कोळी समाजाचे जीवनचक्र पूर्णतः मासेमारीवर आधारित आहे. मात्र सध्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पांमुळे त्यांचे नैसर्गिक जलस्रोत, जाळी टाकण्याच्या जागा, मासे प्रजनन क्षेत्रे आणि विक्रीसाठी लागणार्‍या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत चालल्या आहेत.

परिणामी शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, मासेमार समाजात अदृश्य बेरोजगारी (वळीर्सीळीशव र्ीपशाश्रिेूाशपीं) प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या निवेदनावर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद कोळी यांच्या स्वाक्षरीसह मागण्या सादर केल्या गेल्या असून, शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारंपरिक मासेमारीस पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

कोळी समाजाच्या वतीने पुढील पाच प्रमुख मागण्या

1. गाव उपगाव खाडी घोषित करून मासेमारीसाठी अधिकृत परवाने द्यावेत.

2. मासेमारीसाठी लागणारी परंपरागत साधने (होडी, खवला, जाळी) यांना कायदेशीर मान्यता द्यावी.

3. नैसर्गिक जलाशयांमध्ये मत्स्यपालनाच्या योजना लागू कराव्यात.

4. मासे विक्रीसाठी कायमस्वरूपी मच्छी बाजारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

5. मासेमारी करणार्‍या समाजासाठी विशेष निधी व विकास योजना कार्यान्वित कराव्यात.

कोळी समाजाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित ही अर्थव्यवस्था केवळ स्थानिकांचाच नव्हे, तर संपूर्ण जैवविविधतेचा भाग आहे. त्यामुळे विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत मासेमारी व्यवसायाचे जतन करणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे, असे या निवेदनातून अधोरेखित करण्यात आले आहे.
आनंद कोळी, अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली, ठाणे जिल्हाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT