Kisan Kathore Pudhari
ठाणे

Kisan Kathore: नऊ वर्षे साथ दिली; यावेळी संयम अपेक्षित होता-आ. कथोरे

टीडीसी बँकेच्या सत्तासंघर्षात अनपेक्षित ट्विस्ट

पुढारी वृत्तसेवा

शहापूर: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला आ. किसन कथोरे यांच्या वक्तव्याने नवे वळण मिळाले आहे. मागील ९ वर्षे आम्ही राजेश पाटील यांना अध्यक्षपदासाठी खंबीर साथ दिली.

यावेळी त्यांनी संयमाची भूमिका घ्यायला हवी होती, असे मत व्यक्त करत आ. किसन कथोरे यांनी बँकेच्या सत्तासंघर्षातील घडामोडींवर माध्यमांशी बोलतांना भाष्य केले. बँकेच्या अध्यक्षपदी अरुण पाटील आणि उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची झालेली निवड ही बँकेच्या हिताचा विचार करूनच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माध्यमांशी बोलतांना आ. कथोरे म्हणाले की, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, ठेवीदार आणि उद्योजकांचा विश्वास संपादन करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि देशातील नावाजलेल्या सहकारी बँकांपैकी एक आहे.

बँकेचा आजपर्यंतचा पारदर्शक आणि सक्षम कारभार भविष्यातही कायम राहावा, यासाठी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहकार पॅनलला भक्कम पाठबळ दिल्यामुळे अध्यक्षपदी अरुण पाटील आणि उपाध्यक्षपदी भाग्यश्री भोईर यांची निवड शक्य झाल्याचे आ. कथोरे यांनी सांगितले.

बँकेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील यांना सलग ९ वर्षे अध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी माजी आ. हितेंद्र ठाकूर व स्वतः प्रयत्नशील होतो, असे सांगतानाच त्यांच्या मुलाने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य वाटले नाही, असे आ. कथोरे म्हणाले.

या निवडणुकीत सहकार पॅनलवर विश्वास दाखवून विजय मिळवून देणाऱ्या शेतकरी मतदार हितचिंतक व सर्व कार्यकर्त्यांचे आ. कथोरे यांनी आभार मानले. तसेच नव्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार विकासाभिमुख, शेतकरीहिताचा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT