डोंबिवली (ठाणे) : विषारी सर्पाने डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यास गेलेल्या चिमुरडीला झोपेत डंख मारला. यात चिमुरडीचा मृत्यू झाला, तर सर्पाचे विष भिनल्याने मावशी देखिल बाधित झाली. सद्या मावशीवर ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राणगी विकी भोईर (४) असे मृत मुलीचे नाव असून ही मुलगी डोंबिवली जवळच्या आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडील आणि जुळी बहीण प्रांची हिच्या समवेत राहत होती. शनिवार/रविवार सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी ही खंबाळपाड्यात राहणारी तिची
मावशी बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (२३) हिच्याकडे मुक्कामी गेली होती. शनिवार/रविवारच्या रात्री मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला होता. प्राणगी ही तिची मावशी बबली उर्फ श्रुती जवळ झोपली होती. गाढ झोपेत असताना सापाने प्रथम प्राणगीला चावा घेतला. त्यानंतर सापाने तिची मावशी बबली उर्फ श्रुतीलाही चावा घेतला.
सर्वाधिक विष भिनलेल्या प्राणगीला दवाखान्यात नेण्यापूर्वी जीवास मुकावे लागले. तर बबली उर्फ श्रुती हिच्याही शरीरात विष भिनल्यामुळे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. सद्या तिची प्रकृती धोक्याबाहेर गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.