ATM  Pudhari
ठाणे

No ATM Facility: खडवलीत एकही राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम नाही; लोकसंख्या वाढली, सुविधा गायब

बँकिंग व्यवस्थेच्या उदासीनतेविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

खडवली: खडवली परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना मूलभूत बँकिंग सुविधांचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. संपूर्ण खडवली परिसरात आजघडीला एकही राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकेचे एटीएम नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खात्यातील पैसे काढण्यासाठीही अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

एटीएम सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना सायबर कॅफे, ग्राहक सेवा केंद्रे किंवा पैसे काढून देणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र या ठिकाणी पैसे काढताना अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याने नागरिकांना स्वतःच्या पैशांसाठीच ‌‘कमिशन‌’ भरावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. मोठी रक्कम काढण्यासाठी अनेकदा वेगवेगळी कारणे सांगून हेलपाटे मारायला लावले जात असल्याने आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

डिजिटल व्यवहारांचे युग आले असले तरी प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध नसते. बाजारपेठ, लहान दुकाने, ग्रामीण भागातील व्यवहार आणि दैनंदिन खरेदीसाठी आजही रोख पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत खडवलीसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या परिसरात एटीएमच नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत खडवली परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन इमारती, चाळी आणि निवासी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असतानाही बँकिंग सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्वतःचे पैसे काढण्यासाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागतात

खडवलीमध्ये तातडीने राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांची एटीएम केंद्रे सुरू करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँक व्यवस्थापन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार की नागरिकांना आणखी किती दिवस स्वतःचे पैसे काढण्यासाठीही ‌‘दंड‌’ भरावा लागणार, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT