भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त पुरूष आणि महिलांनी धाकटे शहाड गावाच्या वेशीवर रिकामे हंडे कळश्या, घागरी, टब घेऊन निषेध करत केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात शिमगा आंदोलन केले. (छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

KDMC Water Issue | रात्रीपासून रांगा लावूनही हंडा रिकामाच; मनपा प्रशासनाच्या विरोधात शिमगा

कल्याणच्या धाकटे शहाडात पाणी टंचाईची दाहकता; गावाच्या वेशीवर टांगली प्रशासनाची लक्तरे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही कल्याण जवळच्या धाकटे शहाड गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची दाहकता जाणवू लागली आहे. रात्रीचे 3 वाजल्यापासून महिलांना रांगेत उभे राहून पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे स्थानिकांनी केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात शिमगा आंदोलन पुकारले आहे.

अवघ्या तासभर येणाऱ्या पाण्याने प्रत्येकीची हंडा, कळशी देखील भरली जात नाही. प्यायला पाणी नाही तर स्वच्छतेकरीता कुठून पाणी आणायचे ? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात रोगराई पसरण्याची भीती देखिल व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी (दि.16) भरसकळी या भागातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाला. प्रत्येकीने रिकामी हंडा/कळशी घेऊन प्रशासनाच्या नाकर्तेपणाची लक्तरे वेशीवर टांगल्याचे पहायला मिळाले.

कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावात राहणाऱ्या महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडत असून थकव्यासह या महिलांना अन्य शारीरिक त्रास जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षाविरोधात संतप्त महिलांनी रिकामी हंडा, कळशी घेऊन रविवारी (दि.16) सकाळी गावाच्या वेशीवर आंदोलन केले. लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील धाकटे शहाड गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. या गावात 3 हजाराहून अधिक रहिवासी राहत आहेत. ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने आहे. या भागाला रात्री 3 ते 4 या दरम्यान पाणी वितरीत करण्यात येते. केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने महिलांना संपूर्ण रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे अनेक महिलांना अपुऱ्या झोपेमुळे थकवा जाणवतो. शिवाय या महिलांना डोकेदुखीसह आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही महिला डोक्यावर हंडे, कडेवर घागरी/कळश्या घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षभरात या भागातील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मोर्चे काढले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर संतप्त गावकऱ्यांसह महिलांनी रिकामे हंडे कळश्या, घागरी, टब घेऊन गावच्या वेशीवर निषेध करत केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात शिमगा आंदोलन केले. केडीएमसीने जर या भागाचा लवकरात लवकर पाणी टंचाईचा प्रश्न सोडवला नाही तर मात्र याच आंदोलनाला उग्र स्वरूप धारण होईल, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT