कल्याण डोंबिवली महानगरपालिका pudhari file photo
ठाणे

KDMC Thane |केडीएमसीच्या फेरीवाला हटाव! अतिक्रमण नियंत्रण पथकात उलथापालथ

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : रस्ते आणि फूटपाथ बळकावून बसणाऱ्या फेरीवाल्यांशी लागेबांधे असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकात उलथापालथ करण्यात आली आहे.

134 कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बदल्यांची कारवाई केली आहे. हे कामगार दहा प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव आणि अतिक्रमण नियंत्रण विभागांत कार्यरत होते. विशेष म्हणजे बदल्यांच्या कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास संबंधितांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

फेरीवाला हटाव आणि अतिक्रमण नियंत्रण विभागातील काही कामगार अनेक वर्षांपासून एकाच प्रभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या फेरीवाले व बेकायदा बांधकाम करणाऱ्या भूमाफियांशी साटेलोटे असल्याचे समोर आले होते. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी अनेकदा फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले होते. तथापी कल्याण आणि डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटण्याऐवजी वाढत चालले आहेत. फेरीवाला हटाव पथकातील कामगार आणि फेरीवाल्यांमधील साटेलोटे असल्याचे खासगी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. तसेच महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना पाठिंबा देण्यात अतिक्रमण नियंत्रण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी सामील असल्याचीही चर्चा होती. बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना या विभागातील कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

ताकही फुंकून घेणार

पूर्वीही अशा प्रकारे फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामगारांच्या बदल्या झाल्या होत्या. परंतु कर्मचाऱ्यांनी स्थानिक राजकीय आणि मंत्रालयातील नातेवाईकांच्या दबावामुळे बदल्या टाळल्या होत्या. दुधाने पोळले...आता ताकही फुंकून घ्यावे लागणार आहे. मागच्या सारखा यावेळी तसा प्रकार घडणार नाही याची काळजी महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना घ्यावी लागणार आहे.

शिस्तभंगाची कारवाईची नोंद सेवापुस्तकात

संबंधित कर्मचाऱ्यांनी बदलीचे ठिकाण बदलून मिळण्याकरिता वा स्थगित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास संबंधिताविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 च्या नियम 23 नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी. सदर आदेशाची नोंद संबंधितांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी, असेही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT