कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारांबाबत भोंगळ कारभार समोर आला आहे. अडीच वर्षीय मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचे एक्स-रे केल्या नंतर समोर आले. ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई काढण्यात आली.
कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे दोघे आपल्या अडीच वर्षाचा मुलाला घेऊन केडीएमसीच्या रुक्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये आले होते. मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता.
रुग्णालयामधील डॉक्टरांनी मुलाला रेबीज प्रतिबंधकचे इंजेक्शन दिले. मात्र इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत राहिली. मुलाची आई काजल पांडे यांनी सांगितलं की, मुलाच्या कमरेतून सुई बाहेर आलेली नाही.
मात्र डॉक्टरांनी सांगितले, की ती इकडे तिकडे पडली असेल. तुम्ही मुलाला घेऊन जा. थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला. आई-वडील मुलाला घेऊन मुंबईतील शीव रुग्णालयात गेले. त्याठिकाणीही त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.
अखेरीस मुलाच्या आई वडिलांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. कमरेत अडकलेली सुई शस्रक्रिया करुन करण्यात आली. या प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
आमच्या मुलासोबत जो गंभीर प्रकार झाला तो अन्य कोणत्या मुलासोबत व्हायला नको असा त्यांच्या म्हणणं आहे. या धक्कादायक घटनेनंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिंदे सेनेचे पदाधिकारी अमित कोलेकर यांनीही या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारपद्धती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या दक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.