डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजनांचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्यामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोविड तपासणी करण्याच्या सुचना सर्व नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालय यांना देण्यात आल्या आहेत. तसेच कोविङ पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगला पाठवावेत अशा सुचना आरटीपीसीआर लॅब यांना देण्यांत आल्या आहेत. सध्या कोविशिल्ड व्हॅक्सीन आणि कॉर्बीव्हॅक्स या लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे शासनाकडे सदर लसींची मागणी करण्यांत आलेली आहे.
विठ्ठलवाडी फिशमार्केट, शक्तीधाम, रुक्मिणीबाई प्लाझा हे कोविड हॉस्पिटल कार्यान्वीत करण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये आयसीयु बेड, ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यांत आलेले आहे. भविष्यात ऑक्सीजनची पुर्तता होण्याच्या दृष्टीने ऑक्सीजन संयंत्रांची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
नागरिकांना कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास ताबडतोब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागा अंतर्गत असणा-या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. सदर ठिकाणी घेण्यांत येणारे नमुने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गौरीपाड़ा कल्याण (पश्चिम) येथील आरटीपीसीआर प्रयोगशाळेमध्ये तपासण्यांत येतील.
कोविड- १९ प्रसार टाळण्यासाठी सॅनिटायझर चा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा तसेच इतरांपासुन सुरक्षित अंतर ठेवा, वृध्द नागरिक आणि आजारी व्यक्तींची काळजी घ्या असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.