डोंबिवली : चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कर विभागाने कंबर कसली आहे. मंगळवारी (दि.११) सायंकाळी महानगरपालिकेच्या अ प्रभागामार्फत टिटवाळा स्टेशन परिसरातील रिजेन्सी सर्वम् या सोसायटीचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला.
या सोसायटीतील सदनिकाधारकांच्या एक कोटी रूपये मालमत्ता कराच्या थकबाकीसह सोसायटीच्या एकूण ३५ इमारतींच्या रक्कम ५० लाखांच्या पाणी बिल थकबाकीपोटी पाणीपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.
या व्यतिरिक्त अ प्रभागातील ९ अनिवासी अनधिकृत मिळकतधारकांना वांरवार थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत सूचना देऊनही संबंधितांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशांनुसार मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी ९ अनिवासी अनधिकृत मिळकतींवर निष्कासनाची कारवाई देखील करण्यात आली.
अशाप्रकारे कारवाईची मोहिम यापुढे सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत. थकीत करदात्यांनी आपल्या मालमत्ता व पाणीपट्टीवरील थकीत कराचा भरणा तातडीने करून आपल्या मालमत्तांवरील कटू कारवाई टाळावी असे आवाहन महानगरपालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.