डोंबिवली : महिलांचा विनयभंग करणे, त्यांच्याशी अश्लील हावभाव करणे, बालिकेवर लैंगिक अत्याचार करणे अशा स्वतंत्र तीन गुन्ह्यांची अतिजलद अग्रक्रमाने दखल घेण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील मानपाडा, कोळसेवाडी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, तत्परतेने तपास करून आरोपींच्या विरोधात अवघ्या ४८ तासांत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कल्याण पोलिस परिमंडळातील अशाप्रकारे महिलांवरील अन्यायविषयक गुन्हा घडवून त्याचा तपास करून ४८ तासांत दोषारोप पत्र दाखल होण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच प्रक्रिया मानली जाते. या संदर्भात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सदर माहिती दिली.
महिला व बालिकांच्या बाबतीत विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे असे प्रकार आरोपींकडून घडल्यानंतर संबंधित पिडीत महिलेसह तिचे कुटुंब तणावाखाली जाते. अशा पिडीतांनस तात्काळ न्याय मिळावा, अशा प्रकरणांतील आरोपींना कायद्याची जरब बसावी, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, या उद्देशातून मानपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या तिन्ही गुन्हे प्रकरणांचा जलदगतीने स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात आला. तसेच या प्रकरणांचे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
विनयभंग, अश्लील हावभाव आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल आंधळे, मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलावडे या तिघा अधिकाऱ्यांनी गुन्हा घडल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक तर केलीच शिवाय जलदगतीने तपास पूर्ण केला. याच दरम्यान साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. तपासानंतर तात्काळ तिन्ही आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
महिलांची छेडछाड, विनयभंग, बालिकेचा विनयभंंग, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. ही प्रकरणे जलदगतीने न्यायालयात सुनावणीसाठी यावीत. या उद्देशातून तत्परतेने या गुन्ह्यांचा तपास करून न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.अतुल झेंडे पोलिस उपायुक्त, कल्याण.