कल्याण-डोंबिवलीत खंडणीखोर किन्नरांची दहशत; दुकानात घुसून जबरदस्ती File Photo
ठाणे

KDMC News : कल्याण-डोंबिवलीत खंडणीखोर किन्नरांची दहशत; दुकानात घुसून जबरदस्ती

रक्कम न दिल्यास कपडे उतरविण्याची किन्नरांकडून धमकी : प्रत्यक्षदर्शी महिलेने मांडले समाजमाध्यमांवर भयाण वास्तव

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली (ठाणे): नव्याने दुकान सुरू करण्यापूर्वी व्यापार, धंद्यात बरकत येण्यासाठी वास्तूची होम-हवन, पूजाअर्चा केली जाते. मित्र मंडळी, नातलगांसह पाहुण्यांना निमंत्रण दिले जाते. मात्र अशा शुभ कार्याच्या वेळी थेट दुकानात घुसून किन्नरांच्या झुंडीकडून पैशांची जबरदस्तीने मागणी केली जात आहे] हा भयंकर प्रसंग ठाकुर्लीतील एका व्यापाऱ्याबरोबर घडला आहे.

अवघ्या 30 हजारांसाठी जबरदस्ती करणाऱ्या खंडणीखोर किन्नरांच्या दहशतीचे कथन समाज माध्यमांवर कैफियतीद्वारे भयाण वास्तव मांडले आहे. मात्र धाकदपटशामुळे भयभीत झालेल्या दुकानदार यजमानाने पोलिसात तक्रार नोंदविण्यास इन्कार केला. त्यामुळे हे प्रकरण फारसे लांबले नसले तरीही असे प्रकार कल्याण-डोंबिवलीत कुठे ना कुठे सर्रास सुरू असल्यामुळे दुकानदार आणि व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

हा सारा प्रकार ठाकुर्ली पूर्वेकडे शुक्रवारी (दि.4) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे. चार किन्नरांकडून झालेला अत्यंत निंदनीय व चीड आणणारा प्रकार प्रत्यक्षदर्शी महिलेने अनुभवला. एका नवीन भाड्याने घेतलेल्या दुकानाच्या ओपनिंगला ही महिला गेली होती. पूजा विधी सुरू असताना अचानक चार किन्नर दुकानात घूसून ३० हजारांची मागणी करायला लागले. दुकानदार यजमानाने इतकी मोठी रक्कम द्यायला नकार दर्शविला. हे पाहून त्या चौकडीने ब्राम्हणाला दादागिरी करून पूजा विधी थांबवायला सांगितले आणि पूजा पाटावर स्वतः जाऊन बसले. पैसे द्या नाहीतर कपडे काढायला सुरूवात करणार, असे धमकावून शिव्या-शापांची लाखोली वाहत जोरजोराने टाळ्या वाजवून धिंगाणा घातला. हा प्रकार पाहून कार्यक्रमाला आलेले पाहुणे व त्यांची तरूण मुले/मुली सर्वजण घाबरून गेले. यजमानांना तर काहीच सुचत नव्हते. ते अक्षरशः रडकुंडीला आले होते. कारण मागितलेली रक्कम थोडी थोडकी नव्हती. कुठे तक्रार करायची आहे तिथे करा...आम्ही घाबरत नाही...आम्हाला तुम्ही फुकट पैसे देत नाहीत...आमची पण मेहनत आहे...नाहीतर आम्ही आमच्या गुरूला बोलावून घेतो आणि नतंर बघा मग काय होईल, अशा धमक्या देत एकाने ब्लाऊज वर करुन अक्षरशः हौदोस घालायला सुरूवात केली. शेवटी हातापाया पडून त्या दुकानदाराने इतके पैसे देणे शक्‍य नसल्याचे सांगून विनवणी केली. तरीही ती चौकडी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट सगळ्या कुटुंबाला धारेवर धरून त्यांच्या मुलांना धाक दाखवून दहशत निर्माण करायला लागले. शेवटी कसेबसे करून १६ हजार रूपये हातावर टेकवून दुकानदार यजमानाने त्या खंडणीबहाद्दर चौकडीला दुकानाच्या बाहेर काढले.

हा सारा प्रकार पाहून संताप-चीड येत होती. सगळे वातावरण बदलून गेले होते. पण सगळे हतबल होऊन फक्त बघत होते. अशा किन्नरांच्या वर्तणूकीमुळे त्यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूती गमावली जाते. एखाद्याने स्वतःच्या मेहनतीने सुरुवात केलेल्या दुकानातील पुजा थांबवून, पूजेच्या पाटावर बसून शुभकार्याचे पावित्र्य नष्ट करण्याचे अधिकार यांना दिले कुणी ? कपडे काढायची धमकी देऊन कपडे काढायला सुरूवात केल्यावर घाबरून पर्याय रहात नाही, म्हणून लाजेखातर पैसे काढून दिले जातात. त्यामुळे किन्नरांकडून उघडपणे लूटमार केली जात आहे. विशेष म्हणजे त्या चौघी किन्नर अत्यंत सुंदर व टापटीप होत्या. अंगावर सोन्याचे दागिने देखील होते व शुध्द व उच्च प्रतीची मराठी बोलत होते. अशा या वाईट प्रवृत्तीच्या किन्नरांमुळे चांगले किन्नर बदनाम होतात आणि मदत करणारे देखील हात आखडता घेतात, असेही या महिलेने तिच्या कैफियत तीत म्हटले आहे.

ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर बऱ्याच फोनद्वारे प्रवासी महिलांनी उपनगरीय लोकलने प्रवास करताना त्रास देणाऱ्या किन्नरांची तक्रार केली. ही तक्रार फक्त महिला प्रवाशांपुरती मर्यादित नव्हती, तर पुरुष प्रवाशांना देखील याचा त्रास होतो. किन्नरांचा महिलांच्या डब्यात रोजचा त्रास आहे. पैशांची मागणी करताना स्पर्श करणे, पैशांशासाठी जबरदस्ती करणे, नाही दिले तर शिव्या/शाप देणे या सगळ्याला घाबरून महिला प्रवासी तात्काळ पैसे काढून देतात. त्यामुळेच महिलांचा डबा जास्त फायदेशीर असतो. बऱ्याचदा अत्यंत किळसवाणे हिडीस रूपाचे किन्नर दारू पिऊन देखील आलेले असतात. त्यावेळेस तर महिलांची फारच कुचंबणा होते. इतका सगळा त्रास सहन करुन एकाही महिलेची आरपीएफ वा जीआरपीकडे तक्रार करायचे धाडस होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. असले प्रकार कुठेतरी थांबायला हवेत. सगळेच किन्नर वाईट नाहीत. परंतु अपप्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे आवाहन सदर महिलेने तिच्या पोस्टद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT