डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीच्या माध्यमातून तिजोरीत आश्चर्यकारक भर टाकली आहे.
केडीएमसीने 14 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत अभय योजना 2024-2025 जाहिर केली होती. या योजनेला कल्याण-डोंबिवलीतील करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कालावधीत एकूण 33 हजार 719 थकीत करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून एकूण 264 कोटी वसूल झाले आहेत. तर कर वसुलीपोटी 502 कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी ही किमया केली आहे. आयुक्त डॉ. जाखड यांनी उपायुक्त देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
थकीत मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा अन्यथा कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केल्यास मिळकतधारकांची नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे, मिळकतीचा लिलाव करणे यासारखी कठोर कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला होता. मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना महानगरपालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या. मात्र नोटीसांना प्रतिसाद न दिलेल्या मिळकतींची जप्ती करण्यात आलेली असून, त्यातील 16 मालमत्तांचा जाहिर लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे. कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांच्या विरोधात वसुलीची कटू कारवाई टाळण्याकरिता करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर निर्धारण आणि संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे.
डोंबिवली पूर्वेतील 8/ग प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांना वारंवार भेटी व नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा करत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे आणि लिपिक रामचंद्र दळवी यांनी थकबाकी पोटी बिगर निवासी मालमत्ता सिल करण्याची कारवाई केली.
यामध्ये मानपाडा रोडला असलेल्या कस्तुरी प्लाझा गृह व व्यापारी संकुलातील मालमत्ता क्र. G01001703500 यांच्या 20 लाख 58 हजार 191 रूपये इतक्या थकबाकी पोटी शितल ॲकेडमी व सोहम क्लासेस सिल करण्यात आले. तर 6/फ प्रभागात सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने श्रीजी पॅलेसमधील 501, मालमत्ता क्रमांक F01014490700 ही सदनिका 1 लाख 55 हजार 266 रूपये इतक्या थकबाकीपोटी सिल केली. तसेच ओरिएंट सोसायटीतील C/409, मालमत्ता क्रमांक F01001864500 ही सदनिका 1 लाख 397 रूपये इतक्या थकाबाकीपोटी सिल करण्यात आली.