डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वेगवेगळ्या प्रभागांतील थकबाकीदारांच्या मालमत्तांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. या कारवाईतून कल्याणची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील सोडली नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील १८ गाळ्यांवर सिलिंगची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या विविध प्रभागांत थकबाकी पोटी अनेक मालमत्ता सील करण्याची कारवाई शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभरात करण्यात आली.
कल्याण पश्चिमेकडील ३/क प्रभाग क्षेत्रात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तरीही मालमत्ता कराचा भरणा करत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ३/क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि अधीक्षक बळवंत बजागे यांच्या पथकाने २ कोटी ६२ लाख ८ हजार ५६५ रूपये इतक्या रकमेच्या वसुलीसाठी मालमत्ता सील करण्याची कारवाई शुक्रवारी (दि.28) रोजी दिवसभरात केली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील १८ गाळे सील करण्यात आले.
१/अ प्रभागातील सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी २ लाख ९० हजार रूपये इतक्या थकबाकीच्या वसुलीसाठी तेथील १० सदनिकांसह ४ दुकाने सील केले. ५/ ड प्रभागात सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी २ लाख १९ हजार ३८० रूपये इतक्या थकबाकीच्या वसुलीसाठी युनियन बँकेचे एटीएम सील केले. कल्याण पूर्वेकडील ४/जे प्रभागात काटेमानिवली ते तिसगाव भागातील मालमत्ता कराच्या ११ लाख ४५ हजार २४१ रूपये इतक्या थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील करून नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे आणि त्यांच्या पथकाने केली. तिसगाव ते नेतिवली परिसरातील मालमत्ता कराच्या ७ लाख ४६ हजार १६६ रूपये इतक्या थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील करण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यासाठीच संबंधितांनी पूर्ण रक्कम केडीएमसीच्या खात्यात जमा केली. गणेशवाडी व कोळसेवाडी या भागातील १ लाख ३३ हजार ९७८ रूपये इतकी थकबाकी वसुलीसाठी नळ कनेक्शन खंडित केल्यानंतर संबंधितांनी तात्काळ पूर्ण रक्कम केडीएमसीच्या खात्यात जमा केली.
डोंबिवली पूर्वेत ७/ग प्रभागात सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या पथकाने आयरे गावातील श्री गजानन कृपा चाळीतील दूकानी गाळ्याला १ लाख ६ हजार १४२ रूपये इतक्या थकबाकीच्या वसुलीसाठी सीलींगची कारवाई केली. याच गावातील साई सहारा चाळीत असलेल्या दोन दुकानी गाळ्यांची १ लाख २६ हजार ३४१ रूपये इतकी थकबाकी होती. हे दोन्ही गाळे सील करण्यात आले. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर व पाणीपट्टी देयके अभय योजनेंतर्गत भरण्याची अंतिम मुदत सोमवारी ३१ मार्च पर्यंत आहे. मात्र तरीही अद्याप थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन रक्कमेचा तात्काळ भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.