डोंबिवली : रस्ते आणि फूटपाथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी दैनंदिन कारवाई करतात. मात्र हेच कर्मचारी जप्त केलेल्या मालाची कशा तऱ्हेने विल्हेवाट लावतात, याचा नमुना एका व्हायरल झालेल्या व्हिडियोच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेला माल आणि हातगाड्या पालिका कार्यालयाच्या आवारात आणल्या जातात. मात्र त्यातील एका हातगाडीवरचे ताक ढोसून फेरीवाल्याला पैसे न देता कर्मचारी कारवाईसाठी तेथून निघून जात असल्याचे या व्हिडीओत आढळून आले आहे.
आधीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे, तसेच लाचखोरांच्या उपद्व्यापांमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बदनामीच्या खाईत लोटली आहे. त्यात या कर्मचाऱ्यांनी भर टाकली आहे. सर्वसामान्य हातावर पोट भरणाऱ्या फेरीवाल्याची अशा पद्धतीने लूट करून ई-गव्हर्नन्स प्रणालीच्या सुवर्ण पुरस्काराने सन्मानित झालेल्या केडीएमसीला एकप्रकारे या कर्मचाऱ्यांमुळे देखिल बदनामीची नामुष्की पत्करावी लागत असल्याची टीका समाज माध्यमांवर होत आहे.
शनिवारी (दि.22) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला. या आवारात काही कामानिमित्त आलेल्या डोंबिवलीकराने त्याच्या मोबाईलद्वारे संकलित केलेला व्हिडियो व्हायरल केला. हा व्हिडियो समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.
नेहमीप्रमाणे केडीएमसीच्या फेरीवाला आणि अतिक्रमण विरोधी पथकाने रस्ते आणि फूटपाथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. कारवाई दरम्यान ग प्रभाग क्षेत्र हद्दीत अनधिकृतपणे ताक विकणाऱ्या फेरीवाल्याची हातगाडी जप्त करून ती विभागीय कार्यालयात आणण्यात आली. हातगाडी सोडविण्यासाठी ताकवाला कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर त्याच्या हातगाडी भोवती पथकातील काही कर्मचारी जमा झाले. त्या फेरीवाल्याला सरबत/ताक बनविण्यासाठी सांगत कर्मचारी हसत खिदळत होते. ताक ढोसल्यानंतर हातगाडीधारक ताकवाल्याला पैसै न देता हे कर्मचारी अतिक्रमण विरोधी वाहनातून पुढच्या कारवाईसाठी निघून गेले. अलीकडे ताकवाला त्या फुकटचंबू कर्मचाऱ्यांच्या नावाने शंख करत होता.
हातावर पोट भरणाऱ्या गरिबाची या कर्मचाऱ्यांना जराही कीव आली नाही. दंडाचे पैसै भरून हातगाडी सोडवून नेऊ. पण फुकट्या कर्मचाऱ्यांबद्दल काही बोलल्यास आपल्यावर आणखी कारवाई होईल, या भीतीने ताकवाला नंतर मूग गिळून गप्प बसला. यापूर्वी फेरीवाल्यांकडील भाजीपाला, फळे, आदी माल जप्त करून पालिकेच्या आवारात आणून टाकला जायचा. रात्री आठ-नऊनंतर हाच माल निवडून कर्मचारी आपापल्या घरी घेऊन जात असत. फेरीवाल्यांवर कारवाई तर करायची आणि त्यांच्याकडील माल-टालही अशा पद्धतीने ओरबडायचा. अशा फुकटचंबू कर्मचाऱ्यांवर आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड काय कारवाई करतील ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.