डोंबिवली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यापैकी हेमंत जोशी यांचे पार्थिव ज्या शवपेटीतून आणले ती शवपेटी जोशी यांच्या अंत्यसंस्कारानंतर डोंबिवलीच्या शिवमंदीर स्मशानभूमीत तशीच एका ठिकाणी कोपऱ्यात पडून आहे. अद्यापही त्या शवपेटीची विल्हवाट लावण्यात आलेली नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुना शवपेटीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ट्विटद्वारे केडीएमसीचा लाजिरवाणा कारभार उघड केला आहे. या ट्वीटच्या माध्यमातून प्रशासनावर निशाणा साधत त्यांनी केडीएमसीचा भोंगळ कारभाराच्या चिंध्या वेशीवर टांगल्या आहेत.
मंगळवारी २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथील पठारावर जमलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशातील २७ नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशात विविध भागात निदर्शने करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचे पार्थिव विमानाने डोंबिवलीत आणले. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी समस्त डोंबिवलीकर भागशाळा मैदानात एकत्रित जमले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरीकांनी त्यांच्या तीव्र भावनाही देखील मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या. त्यानंतर तिघांच्या पार्थिवावर डोंबिवलीच्या स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार पार पडले असले तरी ज्या शवपेटीतून हेमंत जोशी यांचे पार्थिव स्मशानात आणले ती शवपेटीत अद्यापही स्मशानात पडून आहे. तीन दिवस उलटूनही या शवपेटीची अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या या भोंगळ कारभारावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सडकून टीका केली आहे. प्रशासनाच्या लाजिरवाण्या कारभाराबाबत त्यांनी केडीएमसीला लक्ष केले आहे.