डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 3 स्वच्छतालये उभारली आहेत. कल्याणात वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहांचे शनिवारी जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी , आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर (stp) च्या बाजूला आणि संतोषी माता रोडला असलेल्या राणी चौक उद्यान अशा तीन ठिकाणी आकांक्षी शौचालयांचा (Aspirational Toilets) लोकार्पण सोहळा पार पडला.
ही तिन्ही स्वच्छतागृहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑटोमेटेड स्वरूपाची आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करून सुसज्ज स्वरूपात बांधण्यात आली आहेत. या स्मार्ट शौचालयांमध्ये स्मार्ट सेन्सर्स, ऑटोमेटेड वॉश बेसिन, हँड ड्रायर, चाईल्ड फीडिंग रूम, सॅनिटरी नॅपकिन्स वेन्डिंग मशीन, फ्लशिंग व फ्लोअर वॉश सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पाण्यासह विजेची बचत होणार आहे. सदर शौचालयांमध्ये कॉईन कलेक्शन सिस्टीमसह रिमोट सेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे. स्वच्छतागृहांचे बांधकाम उच्च प्रतीचे स्थापत्य मटेरियल वापरून तयार करण्यात आले आहे. सदर स्वच्छतागृहांमध्ये दिव्यांगांसाठी, तसेच महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
आजच्या काळाची गरज पाहता महिलांचे आरोग्य व स्वच्छता या बाबी लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून आकांक्षी शौचालय महिलांना समर्पित करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली. या सुसज्ज स्वच्छतागृहांमुळे कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील नागरिकांना आधुनिक पद्धतीची स्वच्छ सुविधा प्राप्त होणार आहे.
सोमवारपासून (दि.10) स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ महापालिका परिक्षेत्रात होत आहे. स्वच्छतेमध्ये महिलांचे योगदान मोठे असते. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः महिलांनी स्वच्छतेत स्वतःचा सहभाग घ्यावा आणि महापालिकेचे स्टार रेटिंग वाढवण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी यावेळी बोलताना केले.
लोकार्पण कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर, माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले, गणेश जाधव, वीणा जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.