डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने कराच्या थकबाकी वसूली करण्यासाठी जप्त केलेल्या 16 मालमत्तांचा प्रत्यक्ष जाहीर लिलाव करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हा लिलाव सोमवारी (दि.24) दुपारी 3 वाजता कल्याण पश्चिमेकडे असलेल्या शंकरराव चौकात आचार्य अत्रे नाट्यगृहातील कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या करदात्यांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 14 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत अभय योजना 2024-2025 जाहिर केली होती. जानेवारी 2025 अखेर अभय योजना राबवून मालमत्ता कराची निव्वळ रक्कम 334 कोटी रूपये व Internal Receipt पोटी 168 १६८ कोटी रूपये अशी एकूण 502 कोटी रूपये वसूल झाली आहे.
थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. यामध्ये जप्ती, अटकावणी, नळ जोडणी खंडीत आदी कारवाई सुरू केली आहे. कराची थकबाकी वसूली करण्यासाठी 16 मालमत्तांचा प्रत्यक्ष जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच कर निर्धारण व संकलन विभागामार्फत कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती आणि अटकावणी दैनंदिन केल्या जाणार आहेत. त्यामुळे करदात्यांनी अशा प्रकारची कटूकारवाई टाळण्याकरिता आपला संपूर्ण मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी केले आहे.