डोंबिवली : केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवले आणि लाखोंचे बिल काढल्याचा मनसेने आरोप करत अनोखे आंदोलन केले. मिस्टर इंडियाचा लाल चष्मा घालून राजसैनिकांनी आगळेवेगळे आंदोलन करतानाच हातात रंगाच्या बादल्या आणि ब्रश घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला ठोकून काढणार असल्याचा आंदोलनकर्त्या राजसैनिकांनी इशारा दिला आहे.
केडीएमसीने कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर धुवून रंगविण्याच्या कामाची बिले ठेकेदाराला दिली आहेत. राजसैनिकांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली. प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरूदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर अस्तित्वात नसतानाही बिले महापालिकेने दिलीच कशी ? असा सवाल आंदोलनकर्त्या राजसैनिकांनी उपस्थित केला. केडीएमसीच्या या भ्रष्टाचारा विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राजसैनिकांनी सोमवारी (दि.28) दुपारच्या सुमारास मिस्टर इंडियाचा चष्मा घालत हातात ब्रश व रंगाची बादली घेऊन स्टेशन परिसरात आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक डिव्हायडर रंगवत केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाहीतर राजसैनिकांकडून अधिकाऱ्यांची धुलाई केली जाणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी बोलताना दिला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठिकाणी फुटपाथसह डिव्हायडर रंगविणे व धुण्याचे तब्बल चाळीस लाखांचे ठेकेदाराला अदा केले. माहितीच्या अधिकारात हा प्रकार राजसैनिकांनी उघडकीस आणला. त्यासाठी महापालिकेच्या या गैरव्यवहाराविरोधात मनसेने मंगळवारी भर उन्हात रस्त्यावर उतरून प्रतिकात्मक आंदोलन केले.
कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकापर्यंत डिव्हायडर अस्तित्वात नाही. मग हे डिव्हायडर रंगवण्यासह धुण्याचे बिल काढले कसे ? असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी उपस्थित केला. तसेच इतर ठिकाणच्या देखील फुटपाथ आणि डिव्हायडर रंगवण्याचे काम एमसीएचआय या बिल्डरांच्या संघटनेला दिले आहे, तो खर्च ही संघटना करणार आहे. त्याचा महापालिकेच्या बिलाशी काही संबंध नाही, मग त्यांचे बिल देखील केडीएमसीने काढले कसे ? असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला. महापालिकेचे अधिकारी स्वतःची तिजोरी आणि स्वतःचे घर भरत आहेत. केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाही तर मनसे अशा अधिकाऱ्यांना ठोकणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.