डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर निर्धारक व संकलन विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईला वेग देताना व्यापारी गाळे, सदनिकांना सिल करण्यासह नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. करदात्यांवर अशी करू वेळ येऊ नये, यासाठी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी वेळेत कर भरणा करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील 129 मधील तरतुदीनुसार शहरातील जमिनी व इमारतीस कर आकारणी करण्यात येते. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील मिळकतधारकांना मालमत्ता कराची देयके वितरीत केली जातात. महानगरपालिकेच्या कर निर्धारक व संकलक विभागाकडून कर वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जनजागृती देखिल करण्यात येत आहे. तथापी मालमत्ता कर थकवणाऱ्या व दिलेल्या मुदतीत कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरूध्द महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर वसुलीची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
आतापर्यंत जवळपास 198 मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 572 मिळकतींवर अटकावणी अर्थात सीलिंगची कारवाई तर केलीच, शिवाय 346 नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जप्तीची कारवाई केलेल्या काही मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरीकांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिनांक 31 मार्च पर्यंत 100 टक्के (दंड/व्याज) माफीची अभय योजना लागू केली आहे. थकीत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा त्वरीत करून महापालिकेस सहकार्य करावे. मालमत्ता जप्ती/सिल/लिलावासारखी अप्रिय कटू कारवाई टाळावी, असे आवाहन कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या 6/फ प्रभागातील 10 गाळे सील करण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी मालमत्ता विभागातील पथकाच्या मदतीने डोंबिवली (पूर्व) नेहरू रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील 8 लाखांची थकबाकी असलेल्या 10 गाळ्यांवर सीलिंगची कारवाई केली. गुरूवारी (दि.20) रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई करताना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागला.